भाजपसोबत घरोब्याने शिरूरमध्ये उमेदवारीचा पेच; एकनाथ शिंदे-अजित पवार गटांत अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 02:25 PM2023-08-24T14:25:07+5:302023-08-24T14:26:27+5:30
महायुतीतील घटक पक्षांच्या इच्छुकांची घालमेल सुरू असून, वर्षभर तिकिटाच्या आशेवर असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे काय होणार, भाजपचा उमेदवार रिंगणात उतरणार का, शरद पवार गटाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे काय निर्णय घेणार, याबाबत चर्चा रंगली आहे...
- डॉ. विश्वास मोरे
पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट भाजपसोबत येण्यापूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले होते. मात्र, दोन्ही गटांनी भाजपशी घरोबा केल्याने प्रचंड अस्वस्थता आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या इच्छुकांची घालमेल सुरू असून, वर्षभर तिकिटाच्या आशेवर असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे काय होणार, भाजपचा उमेदवार रिंगणात उतरणार का, शरद पवार गटाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे काय निर्णय घेणार, याबाबत चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुका मुदतपूर्व होतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. या मतदारसंघात खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हवेली आणि भोसरी हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहराचा काही भाग, चाकण, तळेगाव ढमढेरे, शिरूरची एमआयडीसी आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. २००९ ला पुनर्रचना झाल्यानंतर सलग दोनवेळा आढळराव-पाटील शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले. मात्र, २०१९ मध्ये त्यांची हॅटट्रिक डॉ. कोल्हे यांनी चुकवली.
आता सोळा मतदारसंघांचे काय?
लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत जेथे भाजपचा उमेदवार नव्हता, अशा देशभरातील १४४ मतदारसंघांची यादी भाजपने केली आहे. त्यात महाराष्ट्रातील १६ जागांचा आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि बारामतीचा समावेश आहे. त्यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरू आहेत. केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, आता भाजपच्या इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.
तिकिटासाठी चढाओढ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी घरोबा करून राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यातील १२ खासदार, माजी खासदार शिंदे गटाबरोबर गेले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार आढळराव-पाटील यांचा समावेश आहे. आता ही जागा भाजप, शिवसेनेतील शिंदे गट की राष्ट्रवादीतील अजित पवार गटाला जाणार याबाबत चर्चा रंगली आहे.