पुणो : विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे. भाजपा-राष्ट्रवादीच्या युतीमुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. सोशल मीडियामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे पुणो संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी टीका केली.
शिवसेनेच्या पुणो, पिंपरी-चिंचवड व मावळ संपर्कप्रमुखपदी अमोल कोल्हे यांची निवड झाल्यानिमित्त शिवसेनेच्या कार्यकत्र्यानी त्यांचा जाहीर सत्कार केला. या वेळी उपनेते शशिकांत सुतार, शहरप्रमुख अजय भोसले, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, सुनील टिंगरे, मिलिंद एकबोटे, गटनेते अशोक हरणावळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, ‘‘शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नसून, स्वाभिमान जपणारी आहे. महापालिका निवडणुकीसाठी नाउमेद न होता तयारीला लागा. शिवसैनिकांच्या ज्या तक्रारी आहेत, त्या त्यांनी मला सांगाव्यात, तसेच त्यावरील उपायही सांगा. मी डॉक्टर असून, प्रथम आजार समजून घेऊन नंतर इंजेक्शन देईन. ज्यांच्या विरोधात प्रचार करून भाजपा निवडून आली, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.’’