पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध विषयांच्या एमए, एमएस्सी, एमकॉम प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये विभागांकडून प्रवेशासाठी वेगवेगळे नियम लावले जात असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. समाजशास्त्र विभागाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून अचानक ती मागे घेतल्यानेही गोंधळ उडालेला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मोठी चुरस असते. काही विभागांकडून प्रवेश परीक्षा घेऊन त्यामधील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो, तर काही विभागांमध्ये बीए, बीकॉमला मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना त्यासाठी असलेल्या निकषांचे पालन काही विभागांकडून होत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली आहे.राज्यशास्त्र विभागामध्ये अपंग कोट्यातून प्रवेश देताना ४० टक्के अपंग व १०० टक्के अपंग असा भेदभाव केला आहे. वस्तुत: नियमानुसार अपंगांसाठी राखीव असलेल्या जागांवर प्रवेश देताना सर्व अपंगांना एकसमान धरून गुणवत्तेनुसार प्रवेश देणे आवश्यक होते. मात्र, या नियमाचे पालन न करता गुणवत्तायादी जाहीर करण्यात आल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने केली आहे. त्याबाबत त्याने प्र-कुलगुरू तसेच शैक्षणिक प्रवेश विभागाकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे. प्रवेशामध्ये असलेले सांस्कृतिक, क्रीडा आरक्षण यानुसार प्रवेश देतानाही अनेक विभागांचा गोंधळ उडत आहे. विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेच्या सर्व नियमांबाबत विभागांना अवगत करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.गुणवत्तायादी मागे घेतल्याने गोंधळसमाजशास्त्र विभागाने २० जुलै २०१८ रोजी एमए प्रथम वर्ष प्रवेशाची गुणवत्तायादी जाहीर केली होती, मात्र त्यानंतर २३ जुलै रोजी अचानक त्यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध करून ही गुणवत्ता यादी मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. तांत्रिक कारणांमुळे ही गुणवत्तायादी मागे घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण विभागप्रमुख संजय कोळेकर व प्राध्यापक अनुरेखा चारी-वाघ यांनी दिले आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे. गुणवत्तायादी प्रसिद्ध करतानाच ती काळजीपूर्वक तयार करणे आवश्यक होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना झालेला त्रास वाचला असता, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाने विद्यार्थी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 2:02 AM