पुणे : वाहतूक पोलिसांना मोटार वाहन कायद्यानुसार कागदपत्र तपासण्याच्या अधिकाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबईचे वाहतूक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वाहतूक पोलिसांनी गाडीची कागदपत्रे मागू नका, असे आदेश दिले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला राज्य शासनाने प्राधिकार दिलेल्या गणवेशातील पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यास वाहनाच्या वापराशी संबंधित कागदपत्र दाखवावी लागतील, अशी तरतूद कायद्यात असल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे. वाहतूक नियमन करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या वाहतूक पोलिसांच्या कागदपत्र तपासणीबाबत अनेकदा आक्षेप नोंदवले जातात. वाहनाच्या इंजिन अथवा वजनासंदर्भातील कागदपत्रे वाहतूक पोलिसांनी मागू नयेत, अशा सूचना पुणे पोलीस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना दिलेल्या आहेत.वाहनचालक आणि वाहतूक पोलीस यांच्यात नाहक वाद निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याचे नमूद करीत मुंबईत कागदपत्रांची मागणी करू नये, असे आदेश मुंबईत आहेत. पुण्यात मात्र कागदपत्रे तपासणी करण्याचे अधिकार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे आदेश कसे काय, असा प्रश्न आहे. - मोटार वाहन कायद्याच्या कलम १३0 नुसार वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, विमा, प्रदूषण नियंत्रण दाखला व आपले ड्रायव्हिंग लायसन्स गणवेशातील पोलीस किंवा आर.टी.ओ. अधिकाऱ्याने मागितल्यावर वाहनचालकांनी त्वरित दिले पाहिजे. व्यावसायिक वाहन असल्यास वरील कागदपत्रांशिवाय परवाना व योग्यता प्रमाणपत्रदेखील जवळ बाळगणे आवश्यक आहे.
पोलिसांना कागदपत्र तपासणीबाबत संभ्रम
By admin | Published: March 18, 2017 4:56 AM