पुणे : गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत अनिश्चितता आहे. गेल्या वर्षी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींवर लादण्यात आलेले निर्बंध आणि त्यानंतर विक्रीस मिळालेली परवानगी हा अनुभव पाहाता प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती करायची की नाही? या संभ्रमात मूर्तीकार सापडले आहेत. मूर्ती तयार करून ठेवल्या आणि पुन्हा त्यावर बंदी आणली तर मूर्ती पडून राहातील. त्यामुळे मूर्तीकारांनी यंदा शाडूच्याच गणेशमूर्ती तयार करण्याकडे कल दर्शविला आहे.
कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे शाडू आणि पीओपीच्या मूर्ती घडविणारे कारागीर गावाकडे निघू गेले आहेत. कच्च्या मालाचा तुटवडा आहे. रंग, ब्रश यासारख्या व्यवसायाशी निगडित अनेक वस्तुंची बाजारपेठही बंद आहे.
दर वर्षी गणेशोत्सवाच्या तीन महिने अगोदर गणेशमूर्तीच्या कामाला सुरुवात होते. यंदा १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होणार आहे. मात्र जूनपासून पावसास सुरूवात होत असल्याने मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला एप्रिल-मेपासूनच सुरुवात करतात. त्यानुसार काही मूर्तिकारांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. सध्यातरी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे कच्च्या मालाचा मूर्तिकारांना काहीप्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मूर्तिकार त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या मातीतूनच मूर्ती तयार करीत आहेत. बहुतांश मूर्तिकारांचा भर हा यंदाही शाडू मातीच्या मूर्ती करण्याकडेच अधिक आहे. याचे कारण गतवर्षी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींवर घातलेले निर्बंध आणि मूर्तीच्या उंचीची निश्चित केलेली मर्यादा याचा फटका मूर्तिकारांना बसला. यातच कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान मूर्ती घरच्या घरी बादलीतच विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बादलीत विरघळवता येणे शक्य नसल्याने त्याचे विसर्जन कसे करायचे? असा प्रश्न गणेशभक्तांसमोर उपस्थित झाला. त्यामुळे गतवर्षीचा हा सर्व अनुभव पाहाता पीओपी मूर्ती बनविणारे मूर्तीकार देखील शाडू मूर्तींकडे वळले असल्याचे सांगण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------
आमच्यासमोर प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती करायच्या का नाही? याबाबत संभ्रम आहे. प्लास्टरच्या मूर्ती केल्या आणि ऐन वेळेला परवानगी मिळाली नाही, तर काय करणार? गेल्या वर्षी पीओपी मूर्तींच्या विक्रीवर बंदी आणली आणि गणेशोत्सवाच्या दोन दिवस अगोदर बंदी उठवली. अशामुळे नागरिकांमध्ये देखील गोंधळाची स्थिती निर्माण होते. गेल्या वर्षी ब-याच मूर्ती शिल्लक राहिल्या. त्यांची विक्री झाली नाही. यंदाही नागरिक प्लास्टरकडे वळतील असे वाटत नाही. मूर्तिकार गेल्या वर्षी शिल्लक असलेल्या पीओपीच्या मूर्तीच विकतील असे वाटते आणि आता प्लास्टर देखील मिळत नाही. गुजरातवरून प्लास्टरचा माल आलेला नाही. भाविक शाडूच्या मूर्तीलाच प्राधान्य देतील.
- गणेश लांजेकर, मूर्तिकार
---------
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट राहाणारच आहे. त्यामुळे उत्सवावरची अनिश्चितता कायम आहे. कच्च्या माल उपलब्ध नाहीच. पण माल आणण्यासाठी देखील पैसे हवेत, ते कुठून आणणार?अशी स्थिती आहे.
- विवेक खटावकर, तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष आणि शिल्पकार
--------------------------------