पुणे : दिल्ली विमानतळावर छप्पर कोसळून दुर्घटना झाल्यामुळे लोहगाव विमानतळावरून शुक्रवारी सकाळी ६:४० मिनिटांनी जाणारे पुणे- दिल्ली एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. एअर इंडियाच्या डेकसमोर बसून प्रवाशांनी ‘एअर इंडिया हाय हाय’ अशा घोषणा दिल्या.
लोहगाव विमानतळावरून शुक्रवारी सकाळी ६:४० वाजता एअर इंडिया एक्स्प्रेसचे पुणे ते दिल्ली विमान उड्डाण करणार होती; परंतु दिल्ली विमानतळावर दुर्घटना झाल्यामुळे दिल्लीवरून पुण्याला येणारी विमान रद्द झाली होती. तेच विमान पुन्हा दिल्लीकडे जाणार होते; परंतु विमान न आल्यामुळे दिल्लीकडे जाणारे विमान रद्द करण्यात आले. याबाबत प्रवाशांना ऐन वेळी सांगण्यात आले. सकाळी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. ऐन वेळी विमान रद्द झाल्यामुळे गैरसोय झाली. त्यामुळे उपस्थित प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
दिल्लीला जाणारे प्रवासी प्रकाश सोनावणे यांनी सांगितले, की विमान रद्द झाल्याचे प्रवाशांना ऐन वेळी सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. एअरलाइन व्यवस्थापनाला आधीच सर्व माहिती असते, तरीही त्यांनी विमान रद्द झाल्याची पूर्वसूचना प्रवाशांना दिली नाही. एअर इंडिया एक्स्प्रेसचे कर्मचारीही प्रवाशांना नीट उत्तरे देत नसल्याने संतापाची भावना आहे.