लोकमत न्यूज नेटवर्कभिगवण : जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेशासाठी मिळणारे अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना बँकेत खाते उघडण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. याचा विद्यार्थी आणि पालकांना त्रास होत आहे. खाते उघडण्याच्या त्रासाने आणि शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ४०० ते ५०० रुपयाच्या मागणीमुळे पालक गोंधळले आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळावा आणि यातून कोणत्याही प्रकारे अनुदानाचा गैरवापर होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने मिळणारे अनुदान लाभार्थींना त्यांच्या बँक खात्यावर मिळावे असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु केला आहे. परंतु याच प्रकल्पाने पालकांचे कंबरडे मोडले आहे. याबाबत गट शिक्षण अधिकारी हनुमंत कौलगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यात होत असलेली अडचण मान्य करीत शाळांना राष्ट्रीय बँकांऐवजी पुणे जिल्हा सहकारीबँकेत खाते उघडावे अशा सूचना केल्या. तसेच पुणे जिल्हा परिषद शाळेत शून्य रकमेने खाते उघडण्यात येणार असल्याचेही सांगितले.मुलांकडून ४०० रुपये जमा करण्याविषयी बोलताना अनुदान पालकांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे ते म्हणाले. शून्य रकमेने खाते सुरू करण्याचा नियम असताना बँका २०० रुपये भरण्यास सांगत आहेत. तसेच कागदपत्रांच्या कारणाने चार चार दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत. तसेच शाळा व्यवस्थापन समिती प्रत्येक विद्यार्थ्याकडून ४०० ते ५०० रुपयांची मागणी करीत आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या गरीब पालकांना बँकेत खाते उघडायचे कसे हा प्रश्न पडला आहे. अनुदान नाही मिळाले तरी चालेल परंतु बँकेची पायरी नको, अशी धारणा पालकांची झाली आहे. बँकेत खाते उघडण्यावेळी बँक कर्मचारी मदत न करता खाते उघडण्यासाठी एजंटकडे बोट दाखवित असल्याचेही समजते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची अन् पालकांची सगळ्याच बाजूने कोंडी झाली आहे. त्यामुळे अनुदान योजनेत पालकांना नाहक २०० रुपये बँकेला तसेच शाळा प्रशासनाला ५०० आणि खाते उघडण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागत असल्याने त्यांचे १२०० ते १५०० रुपयांचे नुकसान झाल्यावर दोन गणवेश मिळणार आहेत. त्यामुळे रोखीचा गणवेश परवडला, असे पालक गणेश जराड यांनी सांगितले.
बँक खात्याबाबत पालकांत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 2:33 AM