वाकड (पुणे): महापोर्टल या वेबसाइटद्वारे मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये घेण्यात येणाऱ्या आॅनलाइन परीक्षेसाठी वेळेत लॉगइन झाले नाही. पेपर सुरू असताना अनेकदा वीज खंडित झाल्याने वेळेचा अपव्य झाल्याने नुकसानीचा आरोप करीत दोनशे विद्यार्थ्यांनी सोमवारी परीक्षेवर बहिष्कार घातला. अलार्ड कॉलेज मॅनेजमेंटच्या विरोधात घोषणाबाजी करीत महापोर्टल बंद करण्याची मागणी केली. यामुळे कॉलेज परिसरात काही काळ गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राज्य शासनाच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी महापोर्टल या वेबसाइटद्वारे आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये या परीक्षेचे सेंटर होते. येथे दोन शिफ्टमध्ये सोमवारी आॅनलाइन परीक्षा घेण्यात येणार होती. सकाळी १० वाजता पहिल्या बॅचमधील दोनशे विद्यार्थ्यांचा पेपर होता. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने लॉगइन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा खूप वेळ वाया गेला. दरम्यान, पेपर सुरू असताना अनेक वेळा वीज खंडित झाली़अनेक ठिकाणी संगणक सुरू होत नव्हते. तर काही जणांना संगणकच शिल्लक नव्हते. यामुळे वेळ वाया गेल्याचा आरोप करीत अखेर विद्यार्थी परीक्षेवर बहिष्कार घालून वर्गाबाहेर पडले.पोलिसांनी काढली समजूतया परीक्षा प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत़ त्यातच मुख्य परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना काही गांभीर्य नाही. कॉलेज प्रशासनाचा ढिसाळ कारभार देखील, या समस्येला कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.कॉलेज प्रशासनाच्या विरोधात व महापोर्टलच्या विरोधात घोषणाबाजी केली. अखेर घटनास्थळी दाखल झालेले हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली.परीक्षेलापुढील तारीख देण्यासाठी महापोर्टल प्रशासनाशी बोलणी केल्याने विद्यार्थ्यांचा रोष व गोंधळ कमी झाला.