भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत विस्तारवाढ परतीच्या ठेव कपातीसह ऊस किंमत अदा करणे, साखरेची आधारभूत किंमत केंद्र सरकारने ठरविण्याबाबत शिफारस करण्याच्या विषयावरून गोंधळ उडाला. याच गोंधळात वादग्रस्त विषयांच्या मंजुरीसह ‘वंदे मातरम’ गीत घेण्यात आले. या वेळी गोंधळ उडाल्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा वंदे मातरम म्हणण्यात आले. मात्र, वंदे मातरम गीत अपूर्ण म्हणून गीताचा अवमान केल्याचा आरोप शेतकरी कृती समिती, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सभासदांनी केला आहे.सभेच्या सुरुवातीला कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी कारखाना,विस्तारवाढ प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यानंतर सुरुवातीला इंदापूर तालुका संजय निराधार गांधी योजनेचे अध्यक्ष तानाजी थोरात यांनी पुनर्मूल्यांकनाचा अधिकार आमसभेला आहे. त्यापूर्वीच मूल्यांकन करून कोट्यवधीचे कर्ज केल्याचा आरोप केला. जादा दराने विविध मटेरिअल खरेदीसह चैन खरेदी केल्याचे थोरात म्हणाले. त्यावर अध्यक्ष घोलप यांनी नियमबाह्य खरेदी केली नाही. कारखान्याने उत्पादन खर्चात बचत करून १३ कोटी रुपये वाचविल्याचे नमूद केले. तसेच, विस्तारवाढीसाठी पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सतीश काटे, दिलीप शिंदे, शिवाजी निंबाळकर, बाळासाहेब शिंदे यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला. तर, पृथ्वीराज जाचक यांनीदेखील माहिती देण्यासाठी कारखाना प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे नमूद केले. विस्तारवाढ परतीची ठेवकपात, एफआरपी शिफारशीसह ऊसदर निर्णय घेण्याचे विषय नामंजूर करावे, अशी त्यांनी मागणी केली. राजाराम रायते यांनी मृत सभासदांच्या नावावर किती दिवस साखर देणार, असा संतप्त सवाल केला. त्यानंतर तेरा विषयांमध्ये सुरुवातीच्या ९ विषयांना विरोध झाला नाही. मात्र, विस्तारवाढ ठेवकपातीसह ऊस किंमत अदा करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, २०१४-१५ च्या ऊस किमतीबाबत विचारविनिमय करणे, ऊसदर देण्याबाबत साखरेची आधारभूत किंमत केंद्र सरकारने ठरविण्याबाबत शिफारस करणे या विषयांना विरोध झाला. घोलप यांनी याच वेळी कपातीसह एफआरपी, साखरेची आधारभूत किमतीच्या शिफारशीचा विषय मंजूर केल्याचे जाहीर करून सभा संपल्याचे घोषित केले. मात्र, विरोध केलेल्या विषयांनाच मंजुरी दिल्याने गोंधळ उडाला. विरोधकांनी निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली. तर, सतीश काटे यांनी थेट व्यासपीठावर जाऊन माईक ताब्यात घेऊन विरोध करून निषेध केला. याच गोंधळात वंदे मातरम घेण्यात आले. त्यामुळे राष्ट्राच्या महत्त्वपूर्ण असणारे वंदे मातरम गीत अर्धवट म्हटल्याचा विरोधकांनी आरोप केला. पृथ्वीराज जाचक, ग्राहक पंचायतचे दिलीप शिंदे, शिवाजी निंबाळकर, शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे, सतीश काटे, अॅड. संभाजीराव काटे, तानाजी थोरात या वेळी आक्रमक झाले. वंदे मातरम अर्धवट म्हणून राष्ट्राचा अपमान झाला आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. तर, आमदार दत्तात्रय भरणे यांना लोकप्रतिनिधी असूनदेखील तुमच्यासमोर राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर सभेतून बाहेर पडणारे आमदार भरणे व्यासपीठावर थांबले. त्यानंतर पुन्हा राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यानंतर वंदे मातरम अर्धवट म्हटल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जाचक, शिंदे यांच्यासह सर्वांनी भवानीनगर पोलीस ठाणे गाठले. येथील उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासमोर वंदे मातरम अर्धवट म्हटल्याप्रकरणी संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिलीप शिंदे, पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब शिंदे यांच्यासह सर्वांनीच ठिय्या दिला. (वार्ताहर)
छत्रपतीच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ
By admin | Published: October 01, 2015 1:03 AM