धनकवडी : धनकवडी आंबेगाव पठार (प्रभाग क्रमांक ५५) प्रभागातील तब्बल ४,५००हून जास्त मतदार हे चैतन्यनगर भारती विद्यापीठ (प्रभाग क्रमांक ५६) प्रभागात गेले असून, दक्षिण उपनगरात काही ठिकाणी तर याद्याच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यातच अवघ्या चार दिवसात हरकती घेताना सत्ताधारी - विरोधकांच्या नाकीनऊ येणार असल्याचे स्पष्ट होत असून, मतदारांमध्ये मात्र निरुत्साह दिसून येत आहे.
धनकवडी आंबेगाव पठार (प्रभाग क्रमांक ५५) मधील यादी क्रमांक १९०, १९६, १९७ यामधील वनराई कॉलनी, केशव काॅम्पलेक्स, कानिफनाथ पाटील नगरमधील १,३९४ मतदार, धनकवडी गावठाण, श्रीरामनगर, आहेर चेंबरमधील १,१९८ मतदार, तर गावठाण, श्रीनाथ चौक, राऊत बागमधील १,२९५ मतदार यापैकी ७० टक्के मतदार हे चैतन्य नगर भारती विद्यापीठ (प्रभाग क्रमांक ५६) प्रभागात गेले आहेत, तर काही मतदार हे बालाजीनगर शंकर महाराज मठ (प्रभाग क्रमांक ४९) मध्ये गेले आहेत. चैतन्यनगर भारती विद्यापीठमधील त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठमधील मतदार हे धायरी आंबेगावमध्ये गेले आहेत. याचबरोबर शिवदर्शन पद्मावती (प्रभाग क्रमांक ३८) मधील १,५०० मतदार सहकारनगर तळजाई (प्रभाग क्रमांक ५०) मध्ये गेले आहेत.
''मतदार याद्या निर्दोष असणे आवश्यक असताना महापालिकेच्या घोळामुळे त्यात असंख्य त्रुटी असल्याचे समोर आले आहे. प्रभागातील मतदान यादीत आपली नावे शोधताना मतदारांचीही धावपळ होणार असून, त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. हरकतींसाठी वेळ कमी असून, प्रशासनाच्या जाचक अटींमुळे हे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदार याद्या प्रभागनिहाय दोषविरहीत बनवाव्यात'' असे बाळाभाऊ धनकवडे (अध्यक्ष, जयनाथ तरुण मंडळ, धनकवडी) यांनी सांगितले आहे.