पुणे : गणित आणि भौतिकशास्त्र हा अभियांत्रिकीचा पाया असून या दोन विषयांशिवाय अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश देणे संयुक्तिक ठरणार नाही. या निर्णयामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागांमध्ये वाढही होणार नाही. उलट शिक्षण क्षेत्रात गोंधळाची स्थिती निर्माण होईल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी गणित व भौतिकशास्त्र विषय बंधनकारक असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची भीती दूर करण्यासाठी आणि प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. परंतु, अकरावी-बारावीला भौतिकशास्त्र, गणित हे विषय न घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे वळत नाहीत. त्यामुळे या निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या प्रवेशावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत.
चौकट
“अभियांत्रिकी प्रवेशासाठी नियमावलीत बदल केले जाणार असतील तर प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार का? अकरावी-बारावीत भौतिकशास्त्र आणि गणित विषयाच्या मुलभूत संकल्पनांचा अभ्यास झाल्याचे गृहित धरूनच विद्यापीठाकडून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम तयार केला जातो. मात्र, या पुढील काळात विद्यापीठाला अभ्यासक्रमाबाबत वेगळा विचार करावा लागेल. तसेच ‘ब्रीज कोर्स’मुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कालावधी वाढू शकतो.
- डॉ.गजानन खराटे, माजी अधिष्ठाता,अभियांत्रिकी विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
चौकट
“अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी गणित विषय आवश्यकच आहे. त्यामुळे गणित,भौतिकशास्त्राचा अभ्यास न करणारे विद्यार्थी महाविद्यालयात आले तर प्रथमत: त्यांना या विषयांच्या मूलभूत संकल्पना शिकवाव्या लागतील.”
- डॉ. बी. बी. आहुजा, संचालक, सीओईपी
चौकट
“गणित आणि भौतिकशास्त्राशिवाय अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश देणे चुकीचे होईल. शिक्षण क्षेत्रात आपण आणखी किती तडजोड करणार? अर्थशास्त्र विषयासह इतर विद्या शाखांमधील काही विषयांसाठी गणित अनिवार्यच आहे. या निर्णयामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित होईल. परदेशात गणित अनेक अभ्यासक्रमांसाठी बंधनकारक असताना आपण तो अनिवार्य ठेवतो हे भविष्यात घातक ठरेल.”
-डॉ. वासुदेव गाडे, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
चौकट
“गणित, भौतिकशास्त्राशिवाय अभियांत्रिकी हा अत्यंत गोंधळ घालणारा निर्णय आहे. विज्ञानाच्या मुलभूत संकल्पना समजल्याशिवाय अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्य आहे. तसेच ब्रीज कोर्स केल्याने हा प्रश्न सुटणार नाही. गेल्या दहा वर्षात अभियांत्रिकी शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी आयटी किंवा स्पर्धा परीक्षांकडे वळले. त्यामुळे या निर्णयाने अभियांत्रिकीच्या प्रवेशात वाढ होणार नाही.”
- डॉ. अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ.