पुणे: पुण्यात लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा चालू आहे. सुरुवातीला लसींचा तुटवडा जाणवत नव्हता. मागील काही आठवड्यांपासून कोरोनाच्या औषधांबरोबरच लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यानंतर लसीकरण मोहिमेत अनेकांना लस न घेता माघारीही फिरावे लागले. जवळपास तीन आठवडे झाले हा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अजूनही लसीकरण मोहिमेत सर्वत्र गोंधळ असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रांवर नियोजनाची आवशक्यता असल्याची मागणी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे.
लसीकरण केंद्रांवर सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. केंद्रावर सकाळी लवकर येणार्यांना टोकन दिले जात असून त्यामुळे पहाटे पासून रांगा लागत आहेत. यात आदल्या दिवशीची यादी शिल्लक असेल तर एकही टोकन दिले जात नाही. काही ज्येष्ठांचा एक डोस घेऊन ४५/५० दिवस होऊन गेले आहेत. त्यांना प्राधान्य देण्याविषयी नियोजन करण्यात येत नाही. असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. काही नागरिक सलग 5/6 दिवस 4/5 तास थांबून निराशेत परत येत आहेत. कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशील्ड काही केंद्रांवर आलटून पालटून येत आहेत. त्यामध्ये आज कोणती लस दिली जाणार आहे. यावरूनही सावळा गोंधळ उडत आहे. सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे. केंद्रावर आदल्या दिवशी दुसर्या दिवशीची यादी आणि लस चा प्रकार लिहिल्यास गोंधळ आणि संसर्गाचा धोका दोन्ही टळणार आहे. सर्वात भयानक म्हणजे, लस कमी प्रमाणात येत असल्याने काही ठिकाणी तर एका कुपीतून ११/१२ जणांना लस दिल्याचे कानावर आले आहे. हे अत्यंत गंभीर आहे. ही नागरिकांशी फसवणूक आहे. हा त्यांच्या जिवाशी खेळ आहे. यातील तथ्य तपासून कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे रोज सायंकाळी दुसर्या दिवशी साठीचे नंबर लाऊन बाहेर यादी जाहीर करण्यात यावी. तसेच दुसर्या दिवशी कोव्हॅक्सिन आहे का कोव्हीशील्ड आहे ते ही जाहीर करावे. दुसरा डोस असणार्यांना प्राधान्य देण्यात यावे. या साठी स्वयंसेवकांची आवश्यकता असल्यास तसे नियोजन करण्यास आणि स्वेच्छेने काम करणार्या कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यास आम्ही तयार आहोत. अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.