पुणे: शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राबविल्या जाणा-या आरटीईच्या २५ टक्के आरक्षित जागांचे अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र,शिक्षण विभागाकडून याबाबत दूर्लक्ष केले जात आहे. त्यातच इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील ९६ हजार जागांसाठी सुमारे १ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना पालकांना ओटीपी क्रमांक मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यावर ओटीपी संदर्भातील तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतरच अर्ज भरावा,अशी सूचना शिक्षण विभागाने संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. तब्बल आठवड्यानंतरही शिक्षण विभागाने अडचण दूर न केल्याने पालक गोंधळून गेले आहेत.
शिक्षण विभागाने शाळांची आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम थकवली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शुल्क प्रतिपूर्तीचा वाद शासन व शाळांमध्ये आहे. त्यात विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून दूर ठेऊ नये,अशी मागणी आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केली जात आहे.
-------------------------------
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने येत्या २१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, तांत्रिक अडचण येत असल्याने शिक्षण विभागाने अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.
--------------------