उरुळी कांचन : आरटीईप्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता सोडतीद्वारे निवड झाली आहे व ज्यांचे प्रवेश तीन वेळा मुदतवाढ देवून पूर्ण झाले आहेत. त्यांचे ऑनलाईन शिक्षण काही ठिकाणी सुरु झाले आहे तर काही ठिकाणी अजून सुरु झाले नाही. ही वस्तुस्थिती असताना प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अजून कोणताच संदेश न आल्याने त्यांना प्रवेश मिळणार आहे किंवा नाही हे ऑगस्ट उजाडला तरी कळत नसल्याने पालकांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित होऊनही शहरातील काही शाळांनी संबंधित विद्यार्थ्याचे ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग अद्याप सुरू केले नाहीत. यामुळे या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क डावलला जात आहे, अशा शाळांच्या विरोधात शिक्षण विभाग कठोर भूमिका घेत नसल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांवरील केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अंतर्गत पहिल्या निवड यादीत नावे जाहीर झाल्यानंतर पालकांनी ३ टप्प्यात शाळा प्रवेश घेतला आणि आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून प्रवेश निश्चित केला. मात्र त्यानंतर दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी संबंधित शाळांनी या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण अध्यापन सुरू न केल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर याबाबत म्हणाले, शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क मिळायला हवा, प्रवेश घेऊनही शाळा विद्यार्थ्याचा ऑनलाईन शिक्षणाचा हक्क डावलत असल्यास त्या शाळां विरोधात पालकांनी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी आम्ही त्यांना कार्यवाही करण्यास सांगणार आहे.
आरटी प्रवेशाच्या प्रक्रियेमध्ये राज्यामध्ये ९ हजार ४३२ शाळांनी सहभाग घेतला असून पुण्यामध्ये या शाळांची संख्या ९८५ अशी आहे. राज्यामध्ये एकूण प्रवेशाच्या जागा ९६ हजार ६८४ आहेत. पुण्यामध्ये त्यापैकी १४ हजार ७७३ आहेत. पहिल्या यादीत राज्यांमध्ये ८२,११९ मुलांना प्रवेशासाठी निवडण्यात आले होते आज अखेर राज्यामध्ये ६० हजार ७८७ मुलांनी प्रवेश घेतला आहे. तर पुण्यामध्ये १० हजार ४०५ मुलांनी प्रवेश घेतला आहे.