सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार (दि.1 डिसेंबर ) रोजी मतदान होत आहे. परंतु मतदार यादीतील चुका, दुबार ते तब्बल दसबार मतदार, छायाचित्र नसलेले मतदार, नावातील चुका, चुकीचा ओळखपत्र क्रमांक हा मतदार यादीतील गोंधळ कमी असताना मतदान केंद्रांमुळे या गोंधळात अधिकच भर पडली आहे. गोखलेनगरमध्ये राहणा-या मतदाराचे नाव कॅम्पमध्ये धायरीच्या मतदाराचे नाव कात्रजमध्ये कोथरूडच्या मतदाराचे नाव बाणेरमधील मतदान केंद्रावर आले आहे. यामुळे मतदानावर कोरोनाचे सावट असताना प्रशासनाच्या कारभाराचा मतदानाच्या टक्केवारील मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनानंतर राज्यात प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादीच्या दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ न देताच राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात कोरोनाचे संकट यामुळे प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली आहे. पुणे विभागातील पाचही जिल्हा हा निवडणुकीचे कार्यक्षेत्र असून, विभागात पदवीधर आणि शिक्षक सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही दिवस आगोदर मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करण्यात आली. यामध्ये या शेवटच्या दिवसात अर्ज केलेल्या शंभर टक्के लोकांची नावे मतदार मतदार यादी घेण्यात आली आहेत. ही नावे यादीत समाविष्ट करताना कोणत्याही प्रकारची चाळणी लावली गेली नाही. यामुळे एकाच मतदाराचे नाव दहा,आठ वेळा यादीत आले आहे. दुबार मतदारांची संख्या तर खूपच मोठी आहे. यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता अधिक आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी 232 तर शिक्षक मतदार संघासाठी 125 मतदान केंद्र आहेत. यात सर्वाधिक हवेली तालुक्यात मतदार आणि मतदान केंद्र आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 15 किलो मीटर हद्द लक्षात घेऊन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु सर्वसामान्य मतदारांना आता मतदान केंद्र शोधणे म्हणजे मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहेत. त्या सध्या पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मतदारांमध्ये संसर्गाची भिती आहेतच. यामुळे पदवीधर, शिक्षक मतदार संघात नक्की किती टक्के मतदान होणार याकडे सर्वांचे दक्ष लागले आहे. -------पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघाची पुणे जिल्ह्याची माहिती - पदवीधर एकूण उमेदवार : 62 - शिक्षक एकूण उमेदवार : 35 -------पुणे जिल्ह्यातील एकूण पदवीधर मतदार : 136611-पुणे जिल्ह्यातील एकूण शिक्षक मतदार : 32201---------- पुणे जिल्ह्यातील पदवीधर एकूण मतदान केंद्र : 232-पुणे जिल्ह्यातील शिक्षक एकूण मतदान केंद्र : 125 ---------- मतदारांना आवाहन ..... येथे शोधा मतदान केंद्र पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघात नोंदणी केलेल्या सर्व मतदारांना आवाहन करणेत येते की, पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघा साठी भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मंगळवार 1 डिसेंबर राजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० पर्यत मतदान होणार आहे. या दिवशी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे . पुणे जिल्ह्याच्या मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी व आपले मतदान केंद्राची माहिती घेण्यासाठी खालील संकेतस्थळ व लिंकचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. १. http://pune.gov.in2. http://103.23.150.139/GTSearch2020/