--
यवत : यवत येथे लसीकरण केंद्रात उपलब्ध लस कमी आणि नागरिक जास्त आल्याने मोठा वाद निर्माण झाला. नागरिकांची गैरसोय झाल्याने जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम व सरपंच समीर दोरगे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि लसीकरण कार्यक्रमाचा बोजवारा उडाला.
त्याचे झाले असे, काही दिवसांपासून संत तुकाराम महाराज पालखी तळात लसीकरण केंद्र सुरू आहे. लसीकरण केंद्रात आज केवळ १५० लस आलेल्या असताना लस घेण्यासाठी तीनशेपेक्षा जास्त नागरिक आल्याने गोंधळ उडाला. पहाटे सहापासून नागरिकांनी लसीकरणाला नंबर लावण्यासाठी केंद्रात रांगा लागल्या होत्या. यवत गावातील लोकसंख्या मोठी असताना तुलनेने उपलब्ध होणाऱ्या लस कमी असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे.
खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत यवत येथील लसीकरण केंद्र चालविले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा सेविका, यवत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी लसीकरण केंद्रातील नियोजन करीत होते. मात्र, उपलब्ध होणारी लस संख्या कमी असल्याने नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ येत होती. यात आठवड्यात एखाद्या दुसऱ्या दिवशीच लस येत असल्याने नागरिकांची गर्दी वाढत होती.
आज (दि.७) रोजी पहाटेपासूनच नागरिकांनी लसीकरणाला नंबर लावण्यासाठी रांगा लावल्या होत्या. उपस्थितांना लसीकरणासाठी टोकन वाटण्यात आले. मात्र, लसींची संख्या १५० असताना आलेल्या नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे गोंधळ उडाला. सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम व सरपंच समीर दोरगे यांच्यात लसीकरणाच्या नियोजनवरून शाब्दिक चकमक घडली. वाद-विवाद झाल्यानंतर अखेर लसीकरणाला सुरुवात झाली.
--
कोट -१
लसीचा तुटवडा असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भांडून यवत गावासाठी लस मिळविली आहे. मात्र, लसीकरण करताना वशिलेबाजी होऊ नये, सर्वसामान्य नागरिकांना लस मिळावी यासाठी पाहणी करण्यासाठी लसीकरण केंद्रात गेलो होतो. मात्र, यामुळे सरपंच समीर दोरगे यांनी चिडचिड करणे चुकीचे आहे.
गणेश कदम, जिल्हा परिषद सदस्य
--
कोट २
यवत ग्रामपंचायतीने लसीकरण सुरू झाल्यापासून आरोग्य विभागाला मोठे सहकार्य केले. कसलीही वशिलेबाजी केली नाही. उपस्थितांना टोकन वाटप करून नंबर प्रमाणे लस दिली. आज लसीकरण केंद्रात सुरळीत कामकाज सुरू होते. मात्र, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम यांनी नाहक तेथे येऊन अडथळा आणला यामुळेच लसीकरण विस्कळीत झाले.
समीर दोरगे, सरपंच