काँग्रेसने पुणे महापालिकेच्या पायऱ्या केल्या चक्क गोमुत्राने स्वच्छ; किरीट सोमय्यांचा झाला होता सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 07:18 PM2022-02-11T19:18:27+5:302022-02-11T19:27:16+5:30
काँग्रेसच्या वतीने पायऱ्यांवर गोमूत्र टाकून त्या पुन्हा पवित्र आणि स्वच्छ करण्यात आल्या
पुणे : पुणे महापालिकेत आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच भाजपने जंगी स्वागत केलं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी काही वेळ पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये महापालिका आवरात येताना राडा झाला. पुणे महापालिकेत भाजपकडून पुणे महापालिकेत शक्तीप्रदर्शन अन् घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी गेल्या शनिवारी पुणे महापालिकेत किरीट सोमय्या यांच्यावर केला होता हल्ला त्यामध्ये ते जखमी झाले होते. किरीट सोमय्या यांच्यावर ज्या शिवसैनिकांनी ठिकाणी हल्ला केला त्याच ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचा सत्कार केला. त्यानंतर काँग्रेसने नवी शक्कल लढवत पुणे महापालिकेच्या पायऱ्या चक्क गोमुत्राने स्वच्छ केल्या आहेत.
''पुणे महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. पण शहरातील रस्ता,पाणी अशा समस्यांकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. भाजप फक्त आता स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याकडे लक्षकेंद्रित करू लागले आहेत. आज किरीट सोमय्या यांचे त्यांनी या पायऱ्यांवर जंगी स्वागत केले. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते या पायऱ्यांवर उभे राहिले होते. पुणेकरांना वेठीस धरून त्यांनी याठिकाणी किरीट सोमय्यांचा सत्कार केला. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यामुळे आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने पायऱ्यांवर गोमूत्र टाकून त्या पुन्हा स्वच्छ करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.''
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केले होते सोमय्यांचे स्वागत
किरीट सोमय्यांचा विजय असो, किरीट भाईंचा विजय असो, अशा जयघोषात पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या वतीने किरीट सोमय्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातली. त्यामुळे प्रवेशद्वारावरून पोलिसाना हटण्यास भाग पाडले. महापालिका परिसरात अत्यंत गर्दी झाली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबरच असंख्य नागरिकही उपस्थित होते. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. गेटवर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यावेळी पोलिसांना कार्यकर्त्यांना आवरता आले नाही. सर्व कार्यकर्ते पायऱ्यांवर बसून आहेत. आता पुष्पगुछ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.