पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (mpsc) सोमवारी (दि. ४) अखेर विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण २९० पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात आणखी १०० जागांची वाढ करण्यात येत असल्याचे आयोगाने शुक्रवारी संकेतस्थळावर शुद्धीपत्रक काढत जाहीर केेले आहे. यामध्ये प्रामुख्याने उपनिबंधक सहकारी संस्थांच्या १० जागा, मुख्याधिकारी गट -‘अ’च्या १५ जागा तर मुख्याधिकारी गट-‘ब’ तब्बल ७५ जागांची वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लाेकसेवा आयोगाने यापूर्वी २९० पदांची जाहिरात काढली होती. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्य कर आयुक्त, गट विकास अधिकारी, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, उद्योग उपसंचालक (तांत्रिक), सहायक कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, उप अधीक्षक भूमी अभिलेख, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आणि सरकारी कामगार अधिकारी आदी पदांचा समावेश केला होता. आता शुक्रवारी त्यात उपनिबंधक सहकारी संस्थांच्या, मुख्याधिकारी गट -‘अ’ आणि गट-‘ब’च्या एकूण १०० जागा वाढवण्यात आल्या आहेत.
३९० पदांसाठी येत्या २ जानेवारी २०२२ रोजी ही परीक्षा होणार
राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर आता ३९० पदांसाठी येत्या २ जानेवारी २०२२ रोजी ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा २ जानेवारीला, तर मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे २०२२ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाने सोमवारी (दि. ४) परिपत्रक प्रसिद्ध केले होते. तसेच राज्य सेवेतून भरल्या जाणाऱ्या संवर्गातील पदांसह नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यताही त्यात वर्तवली होती. त्यानुसाच या जागा वाढवण्यात आल्या आहेत.