पुणे : ग्रीस येथील ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळच्या हर्षदा गरुड हिने सोमवारी सुवर्ण पदक पटकाविले. तिने ४५ किलो वजनी गटातील सुवर्ण पदक मिळवून मावळनगरीचे नाव जागतिक नकाशावर झळकावले. त्यामुळे हर्षदाच्या घरी परिसरातील नागरिक दिवसभर पेढे घेऊन येत, त्यांचे अभिनंदन करत आहेत. राज्यातून सर्वच स्तरावर हर्षदाचे कौतुक होऊ लागले आहे. राजकीय नेते, क्रीडा अभ्यासक यांच्याकडून तिचे अभिनंदन केले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा ट्विटरच्या माध्यमातून हर्षदाचे अभिनंदन केले आहे.
''ग्रीस-हेरकिलॉन येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पुणे जिल्ह्यातील मावळची हर्षदा गरुड हिचं अभिनंदन! हर्षदानं देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून तिच्या या सुवर्ण कामगिरीचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असं ते म्हणाले आहेत''
हर्षदा वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुलमधे बिहारीलाल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. शिवाय जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा जिंकत तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मजल मारली होती. २०१९ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले होते. गेल्या १५ दिवसांपूर्वीच तिची भारतीय संघात निवड झाली होती. त्याच वेळी आपण पदक जिंकूनच परत येण्याचा तिने निश्चय केला होता, असे प्रशिक्षक बिहारीलाल दुबे यांनी सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात
हर्षदाचे वडील शरद हे वडगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत. तर आई रेखा या गृहिणी आहेत. वडिलांना खेळात विशेष आवड होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करता आले नाही. त्यामुळे त्यांनी मुलगी हर्षदाला वेटलिफ्टर बनविण्याचे स्वप्न पाहिले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हर्षदाला कोणत्याही गोष्टीसाठी कमतरता भासणार नाही. यासाठी आईवडिलांनी अहोरात्र कष्ट घेतले.