पुणे: शहरातील पहिलीच मेट्रो असणाऱ्या महामेट्रोच्या प्रकलापाला सुरू होऊन ८ पेक्षा जास्त वर्ष झाली तरीही अजून काम पूर्ण झालेले नाही. हे काम त्वरीत पूर्ण करावे, मेट्रो विमानतळापर्यंत न्यावी अशी मागणी करत काँग्रेसच्या वतीने महामेट्रोच्या कार्यालयात सोमवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. पुणेकरांचा संयम संपत आला असल्याचा इशारा देण्यात आला.
काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी दुपारी महामेट्रो कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. जोशी म्हणाले, मेट्रो सारख्या मोठ्या प्रकल्पाचे वेळेचे नियोजन काटेकोर करायला हवा. ते केले नसल्यामुळे मागील ८ वर्षे पुणेकर मेट्रोच्या कामाचा त्रास सहन करत आहेत. अर्धवट कामाची उदघाटने राजकीय हेतूने घाईघाईत केली गेली, तेही पुणेकरांनी सहन केले, मात्र आता हद्द झाली आहे. अजूनही मेट्रोचे काम अपूर्णच आहे व ते पुणेकर यापुढे सहन करणार नाहीत.
मेट्रोचा पहिला टप्पाच अजून पूर्ण झालेला नाही. भाजप नेत्यांच्या सुप्त संघर्षात मेटुोचे काम लांबत गेले, त्यामुळे लाखो रूपयांनी खर्च वाढत गेला. ज्या पुणेकरांनी भाजपला महापालिकेत सत्ता दिली, आमदार, खासदार निवडून दिले, पण पुणेकरांना मेट्रो सेवेचा पुरेपूर लाभ भाजप देवू शकले नाही. याकडे भाजपचे त्यांच्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले, असे मोहन जोशी म्हणाले. दत्ता बहिरट, सुनिल मलके, मंजुर शेख,शेखर कपोते, प्रवीण करपे, शाबिर खान, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, विनोद रणपिसे, रोहन सुरवसे पाटील, किशोर मारणे, सुरेश कांबळे, रामविलास माहेश्वरी, बाबा नायडू, महेंद्र चव्हाण व अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.