पुणे: केंद्रातील भाजपा सरकारपासून देशातील लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीला घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरूवारी सकाळी साकडे घालण्यात आले. संबळ वाजवून मोदी सरकारचा निषेध करत लोकशाहीचा जागर करण्यात आला. शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश ऊपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, रविंद्र धंगेकर, सुधीर काळे, अमीर शेख, प्रविण करपे यावेळी ऊपस्थित होते.
जोशी म्हणाले, देशात केंद्र सरकारच्या पाठिंब्याने दहशतीच्या घटना घडवल्या जात आहेत. केंद्रीय मंत्रीच धमक्या देत असतात. पोलिसी बळाचा वापर होत आहे. केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून विरोधकांना संपवले जात आहे. या दृष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी आम्ही बया दार ऊघड करत देवीला साकडे घातले आहे.
शहराध्यक्ष बागवे म्हणाले, ‘‘केंद्रातील मोदी सरकार देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहे. कोणत्याही घटनेवर पंतप्रधान तोंड उघडायला तयार नाहीत. देशात याआधी कधीही असे घडले नव्हते. मोदी सरकारला सदबुद्धी द्यावी अशा आमची देवीचरणी प्रार्थना आहे. देवीला यावेळी श्रीफळांचे तोरण चढवण्यात आले. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. सतीश पवार, बाळासाहेब अमराळे, ऋषीकेश बालगुडे, नितीन परतानी, गणेश शेडगे, बबलू कोळी, विशाल मलके, चेतन आगरवाल, सौरभ अमराळे, राजेश शिंदे, व पक्ष कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.