लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पेट्रोल, डिझेलची अवाजवी दरवाढ करून मोदी सरकार देशातील जनतेला लुटत असल्याचा आरोप करत काँग्रेसने शहरातील सोमवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता एकाच वेळी शहरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर आंदोलन करण्यात आले.
राज्यात १ हजार ठिकाणी आंदोलन झाल्याचा दावा प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला. केळकर चौकातील कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळ जोशी यांच्यासहित काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, बाळासाहेब अमराळे, वीरेंद्र किराड आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनासाठी घोड्याची बग्गी आणली होती. त्यात बसून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी, देशाला विश्वासात घेऊन मोदी यांनी इंधन दरवाढीतून मिळालेल्या पैशांचे काय केले याचा खुलासा करावा, अशी काँग्रेसची देशपातळीवर मागणी असल्याचे या वेळी जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, “मोदींच्या कारकिर्दीत पेट्रोलची ३५० टक्के तर डिझेलची ९०० टक्के वाढ झाली. यातून मिळालेले ८० हजार कोटी रूपये कुठे गेले याचा पत्ता नाही. मोदी सरकार देशाची लूट करत आहे हाच याचा पुरावा आहे.”
शहरात कर्वे रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक तसेच औंध, बाणेर, येरवडा, कोथरूड, वडगाव या उपनगरांमधील पेट्रोल पंपावरही कॉंग्रेसचे आंदोलन सकाळी करण्यात आले. शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, प्रवीण करपे, विरेंद्र किराड, दुर्गा शुक्रे, स्वाती शिंदे, अंजली सोलापूरे, नलिनी दोरवे, पपीता सोनावणे, बबलू कोळी आदी ठिकठिकाणच्या आंदोलनात सहभागी झाले होते.