पुणे शहर एकीकडे खड्ड्यात तर दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी धुंदीत : काँग्रेसचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 09:21 PM2021-06-11T21:21:57+5:302021-06-11T21:23:25+5:30
पुणे शहराकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना पुणेकर नक्कीच त्यांची जागा दाखवून देतील.
पुणे : शहरात सध्या रस्ते खोदाईमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. ही रस्ते खोदाईची कामे सत्ताधारी भाजप व प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच का केली नाहीत. जर कामे पूर्ण होणार नव्हती तर खोदाईची परवानगी का देण्यात आली होती. यावरून स्पष्ट होते की, शहर खड्ड्यात असताना सत्ताधारी भाजप धुंदीत आहे असा आरोप काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी सांगितले.
पुणेकाँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना शहरातील रस्ते खोदाईचे कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत निवेदन दिले आहे. बागुल म्हणाले, शहरातील लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड हे मुख्य रस्ते आणि गल्ली बोळातील विविध ठिकाणी रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. त्यामुळे बऱ्याच जागी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पावसाळा येऊन ठेपला तरी रस्त्याची कामे चालूच आहेत. पथ विभागाला जबाबदार अधिकारी कोणी आहे की नाही? आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शहरातील या स्थितीकडे लक्ष आहे की नाही? त्यात एल अँड टीने पाण्याची लाईन टाकण्यासाठी विविध ठिकाणी खोदाई सुरु केली आहे.
आता लॉकडाउन संपला असून नागरिक घराबाहेर पडत आहेत. शहरात वाहतूक कोंडी वाढत आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष देऊन पुणेकरांना दिलासा द्यावा अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल या अगोदरही आयुक्तांना लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे. आता आंदोलन करण्याची वेळ आली असेही बागुल यांनी यावेळी सांगितले.
बागुल म्हणाले, शहराकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पुणेकर नक्कीच त्यांची जागा दाखवून देतील. परंतू, आपल्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ५६ क प्रमाणे कारवाई केली तरच अधिकारी आपली जबाबदारी ठामपणे पार पडतील. त्याशिवाय ते जागे होणार नाही.