लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना नियमावलीबाबत पुणेकर गंभीर नसल्याबाबतचे सरकारच्या ज्येष्ठ वकिलांचे वक्तव्य अयोग्य असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. ज्येष्ठ वकिलांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे न्यायालयाने पुण्यात कडक निर्बंध लागू करण्यासंबंधीचे भाष्य केल्याचे तिवारी म्हणाले.
उच्च न्यायालयापुढे पुणेकरांविषयी विनाकारण चुकीचे चित्र उभे राहिले. वास्तविक पुण्यात रोजंदार, कामगार, पथारीवाले, कष्टकरी, कामगार व व्यापारी उत्स्फूर्तपणे नियमांचे पालन करत आहेत. काही जण बेशिस्त असतीलही, पण पोलिसांकडून त्यांंना समज देण्यात येते. पुणेकरांच्या संयम व शिस्तीचे पालन करण्यामुळेच मागील १८ ते २० दिवसांतील सक्रिय कोरोना रूग्णसंख्या सरासरी रोज एक हजाराने कमी झाली असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसते, असे तिवारी यांनी सांगितले.
वकिलांच्या चुकीच्या वक्तव्यामुळेच उच्च न्यायालयाचा गैरसमज झाला असावा. त्यातूनच न्यायालयाने कडक निर्बंधांबाबत सुचवल्याने पुण्यातील रोजंदारीवर अवलंबून असणारे, नोकरदार यांच्यात नाहक धास्तीचे वातावरण पसरले असल्याचे तिवारी यांनी म्हटले. न्यायालयाला निर्देश द्यायचेच असतील तर महापालिका, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त प्रशासनास सरकारी-खाजगी हॅास्पिटलमधील रिकामे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याची एकाच ठिकाणी माहिती देणारा ‘रिअल टाइम डॅश बोर्ड’ अद्ययावत करण्याबाबत द्यावेत, असे तिवारी यांनी म्हटले आहे.