पिंपरी : शिवसेनेने शहर कार्यकारिणीत संघटनात्मक बदल केले असून, विधानसभा मतदारसंघनिहाय तीन शहरप्रमुख नेमण्याऐवजी तिन्ही मतदारसंघांसाठी मिळून एकच शहरप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला आहे. शहरप्रमुखपदी राहुल कलाटे यांची, तर महिला शहर संघटक म्हणून नगरसेविका सुलभा उबाळे यांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येही पदाधिकारी बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बुधवारी झालेल्या भाजपच्या सदस्यनोंदणी आढावा बैठकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही पदाधिकारी बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या शहर कार्यकारिणीत बदल घडून येणार हे निश्चित मानले जात आहे. भाजप शहर कार्यकारिणी पूर्वीप्रमाणे कार्यरत असली, तरी आता चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे लवकरच भाजपच्या कार्यकारिणीत बदल होणारच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवकांचे राज्यव्यापी शिबिर पुढील आठवड्यात बालेवाडीत होणार आहे. या शिबिरानंतर पक्ष संघटनेच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल घडून येणार आहेत. असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसमध्ये नुकतेच बदल घडून आले. भाऊसाहेब भोईर यांच्या जागी सचिन साठे यांची शहराध्यक्षपदी निवड केली. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे. गटनेतेपदी कैलास कदम यांची निवड करण्यात आली. आता विरोधी पक्षनेते पदाचा विनोद नढे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होऊ लागली असून, विरोधी पक्षनेतेपदीही कदम यांची निवड केली जाणार आहे. पक्षश्रेष्ठींनी तसे पत्र विभागीय आयुक्तांना दिले आहे. काँग्रेस शहर कार्यकारिणीत मोठी उलथापालथ होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी मित्रपक्षावर विसंबून न राहता पक्ष संघटन मजबूत करण्यास प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच पक्षान्तर्गत गटबाजी वारंवार उफाळून येत असल्याने आरपीआय सुद्धा शहर कार्यकारिणीच्या बदलास अपवाद राहणार नसल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेस, राष्ट्रवादीही पदाधिकारी बदलणार
By admin | Published: January 30, 2015 3:37 AM