काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ‘डीएनए’ एकच : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 11:36 AM2018-12-10T11:36:39+5:302018-12-10T11:46:24+5:30
राजकारण, समाजकारण किंवा क्रिकेट असो प्रत्येक ठिकाणी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असते.
पुणे : स्वयंपाकघर जरी वेगळे असले, तरी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस एकाच घरातील दोन मुले आहेत. राजकारण, समाजकारण किंवा क्रिकेट असो प्रत्येक ठिकाणी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असते. अशावेळी भांडयाला भांडे लागते. मात्र, त्यामुळे आमच्यातील प्रेम काही कमी झालेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा ’’डीएनए’’ एकच आहे. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात महाविद्यालयीन युवतींना प्रोत्साहन देण्याकरीता आयोजित १९ वषार्खालील महिलांच्या सोनिया गांधी करंडक टी २० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन स्वारगेट येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी सोनल पटेल, मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, कैलास कदम, नगरसेवक अजित दरेकर, वीरेंद्र किराड, काका चव्हाण, मुकारी अलगुडे, रुपाली चाकणकर, विकास टिंगरे, विवेक भरगुडे आदी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, क्रिकेट हा देशाला व देशवासियांना एकत्र आणणारा खेळ आहे. देशामधील सर्वाधिक लोकप्रिय आणि काही क्षणात भारतीयांमध्ये ऐक्य निर्माण करण्याची ताकद या खेळामध्ये आहे. त्यामुळे सप्ताहाच्या माध्यमातून युवतींमध्ये हा खेळ रुजविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे कार्यक्षम महिला म्हणून नेतृत्व सुपरिचित आहे. अजित पवार आणि मोहन जोशी हे दोन्ही दादा राज्यात व प्रशासनात उत्तम काम करीत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी हे केवळ पक्ष नसून हा गोतावळा असल्याचे त्यांनी सांगितले.
सोनल पटेल म्हणाल्या, सोनिया गांधी या शक्तीचे प्रतिक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहातील सर्व उपक्रम अत्यंत स्तुत्य आहेत. क्रिडा स्पधेर्सारख्या उपक्रमांतून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी जोमाने पुढे काम करुया, असेही त्यांनी सांगितले. मोहन जोशी म्हणाले, व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन जातीयवादी पक्षांना शक्तीने हरविणे, हा उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवायला हवा. युवतींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याकरीता अशा प्रकारच्या स्पर्धा पुण्यामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी होणार असून दररोज दोन सामने होणार आहेत. भोला वांजळे यांनी सूत्रसंचालन केले. नीता परदेशी यांनी आभार मानले.