काँग्रेस भाजपकडून परस्परांच्या कार्यालयांवर निषेध मोर्चे; पोलिसांनी दोघांनाही अडवले
By राजू इनामदार | Updated: April 18, 2025 20:37 IST
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे सुदैवाने दोन्ही ठिकाणी काहीही घडले नाही
काँग्रेस भाजपकडून परस्परांच्या कार्यालयांवर निषेध मोर्चे; पोलिसांनी दोघांनाही अडवले
पुणे: काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीत कारवाई केली, मात्र त्याचे पडसाद काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील कार्यालयांवर उमटले. काँग्रेसने केंद्र सरकारचा निषेध म्हणून आंदोलन केले तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसभवनावरच चाल करण्यात आली. त्यानंतर त्यांना उत्तर म्हणून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयावर चालून गेले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे सुदैवाने दोन्ही ठिकाणी काहीही घडले नाही.
सोनिया व राहुल यांच्यावरील कारवाईचा निषेध म्हणून बुधवारी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार व भाजपचा निषेध केला. मोठ्याने घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यामुळे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, शहराध्यक्ष करण मिसाळ, साकेत जगताप, संदीप सातव, राज तापकीर व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी काँग्रेसभवनवर निषेध मोर्चा काढण्याचे जाहीर केले. करण मिसाळ यांनी सांगितले की राहुल सोनिया यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला निषेध मोर्चा काढण्याचे काहीच कारण नव्हते.काँग्रेसभवनवर जायचे म्हणून युवा मोर्चाचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. काँग्रेस भवनला याची माहिती मिळाल्यानंतर तिथे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ॲड. अभय छाजेड, लता राजगुरू, अविनाश बागवे, अविनाश साळवे, रफिक शेख व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेसभवनच्या आवारात खुर्च्या टाकून बसले. ‘आम्ही महात्मा गांधी यांचे विचार मानणारे आहोत, त्यामुळे ते इथे आलेच तर आम्ही त्यांचे स्वागत करू, त्यासाठीच आम्ही त्यांची वाट पाहतो आहे’ असे शहर सरचिटणीस अजित दरेकर यांनी सांगितले.
घोषणा देत मोठ्या संख्येने निघालेल्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बालगंधर्व रंगमंदिराजवळच अडवले. तिथून पुढे काँग्रेसभवनकडे जाण्यास त्यांना अटकाव करण्यात आला. पदाधिकारी बराच वाद घालत होते, मात्र पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे थोड्या वेळानंतर बहुसंख्य कार्यकर्ते तिथून निघून गेले.दरम्यान युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे, प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन यांनी कार्यकर्त्यांना घेऊन लगेचच भाजपच्या डीपी रस्त्यावरील कार्यालयाकडे धाव घेतली. त्यांनाही पोलिसांनी कार्यालयाच्या अलीकडील चौकातच अडवले. पुढे जाण्यास त्यांना मनाई करण्यात आली. सर्वाना अलंकार पोलिस ठाण्यात आणण्यात आले. थोडा वेळ तिथे थांबवून सर्वांना सोडून देण्यात आले.