पुण्याची पाणीकपात कांचन कुल यांच्या फायद्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:44 PM2019-05-02T15:44:14+5:302019-05-02T15:44:16+5:30
भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना फायदा व्हावा, यासाठीच पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालव्यातून पाणी सोडण्याचे महापाप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
पुणे : पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट असताना बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना फायदा व्हावा, यासाठीच पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालव्यातून पाणी सोडण्याचे महापाप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पाणीकपातीविरोधात यापुर्वी अनेकदा आंदोलने करण्यात आली असून यापुढेही पालकमंत्र्यांना याचा जाब विचारला जाईल, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
निवडणुक काळात खडकवासला धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले जात आहे. या कालव्यातून दौंड व इंदापुर तालुक्यामध्ये पाणी जाते. तर सध्या पुण्यामध्ये दिवसाआड पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची चर्चा आहे. याविषयी पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी व अभय छाजेड यांनी पालकमंत्र्यांवर टिकेची झोड उठविली. जोशी म्हणाले, ‘पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे पुणेकरांवर पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये सर्व धरणे भरली असताना त्याचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे पुणेकरांना एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. या कृत्रिम पाणीटंचाईला बापटच जबाबदार आहेत. कांचन कुल यांना निवडणुकीत फायदा व्हावा, यासाठीच बापट यांनी प्रशासनावर दबाव टाकून पाणी सोडले. हे महापाप करून त्यांनी पुणेकरांची फसवणुक केली आहे.’ दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेही या महापापामध्ये सहभागी आहेत का? या प्रश्नावर जोशी यांनी बापटांनाच जबाबदार धरत मौन बाळगले.‘पाणीकपातीविरोधात काँग्रेसने यापुर्वी अनेकदा आंदोलने केली आहेत. पण नियोजन न केल्याने पाणीकपातीची वेळ आली आहे. यापुढील काळातही पाणीकपातीबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलन केले जाईल,’ असे बागवे यांनी स्पष्ट केले.