कसब्यात काँग्रेसने गड भेदला, चिंचवडमध्ये भाजपने राखला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 06:14 AM2023-03-03T06:14:13+5:302023-03-03T06:14:38+5:30
भाजपच्या बालेकिल्ल्यात मविआचे धंगेकर विजयी; दुसरीकडे भाजपच्या जगताप यांना प्रचंड मताधिक्य पुण्यातील निकालांनी वेधले देशाचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११,०४० मतांनी पराभव केला.
तब्बल ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला. कमळ कोमेजले व भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा गुलाल उधळला, तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी ३६,१६८ मताधिक्य घेत विजय साकारला. राष्ट्रवादीचे नाना काटे ९९,३४३ मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले.
कसे मिळाले मविआला ‘टॉनिक’?
n कसबामधील विजयाने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे मनोधैर्य वाढले आहे. महापालिकेत पाच वर्षे एकहाती सत्ता आणि खासदार, पाच आमदार, असा मोठा फौजफाटा असतानाही बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारल्यामुळे भाजपला चिंतन करावे लागणार आहे. या निवडणुकीत भाजपने ४० स्टार प्रचारक उतरवले होते.
n मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवस पुण्यात ठाण मांडून होते. उपमुख्यमंत्री फडणवीस हे दहावेळा पुण्यात आले होते. त्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त झाला. धंगेकर यांची लोकप्रियताही महत्त्वाची ठरली.
n कसब्यातील गणेशोत्सव मंडळे आणि स्थानिक संस्था-संघटनांशी धंगेकरांचा उत्तम ‘कनेक्ट’ आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेले. त्यामुळे ठाकरे गटांच्या शिवसैनिकांनी या निवडणुकीत नेटाने काम केले.
तीस वर्षांनंतर इतिहास घडला
१९९१ ची पोटनिवडणूक वगळता या कसबा मतदारसंघावर भाजपचेच प्राबल्य राहिले. इथे गिरीश बापट पाचवेळा आमदार होते. त्यानंतर मुक्ता टिळक या आमदार झाल्या होत्या. १९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसचे वसंत थाेरात यांनी बापट यांचा पराभव केला होता. तीस वर्षांनंतर येथे इतिहास घडला आहे.
का पुन्हा फुलले चिंचवडमध्ये कमळ?
n चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी होऊन राहुल कलाटे अपक्ष लढले. त्यांना मिळालेल्या मतांहून कमी फरकाने राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा पराभव झाला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे या मतदारसंघात सलग तीनदा निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा प्रभाव कायम होता.
n ते अजित पवारांच्या जवळचे असूनही २०१४ च्या निवडणुकीवेळी ते भाजपत गेले. पुढे फडणवीस यांचे खास झाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करण्याला अजित पवार यांनी प्राधान्य दिले; परंतु त्यांना बंडखोरी रोखता न आल्याने तिरंगी लढत झाली. बंडखोर कलाटे यांच्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने कारवाई केली नाही.
n त्यामुळे त्यांना ठाकरे गटाचा छुपा पाठिंबा असल्याची अफवा पसरली. ठाकरे गटाशी युती करणारे वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही कलाटे यांना जाहीर पाठिंबा देऊन सभा घेतली. त्याचाही फटका मविआला बसला