जनतेच्या पैशाला काळा पैसा म्हटले, काँग्रेस करेल नोटाबंदीची चौकशी : आनंद शर्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 06:14 AM2017-11-18T06:14:26+5:302017-11-18T06:14:58+5:30
नरेंद्र मोदी हे देशाचे असे पहिले पंतप्रधान आहेत, की ज्यांनी जनतेच्या पैशाला काळा पैसा असा म्हटले. नोटाबंदी हा एक महाघोटाळा आहे. काँग्रेस आज ना उद्या सत्तेवर येणारच आहे. त्या सरकारचे पहिले काम या महाघोटाळ्याची चौकशी करणे हेच असेल
पुणे : नरेंद्र मोदी हे देशाचे असे पहिले पंतप्रधान आहेत, की ज्यांनी जनतेच्या पैशाला काळा पैसा असा म्हटले. नोटाबंदी हा एक महाघोटाळा आहे. काँग्रेस आज ना उद्या सत्तेवर येणारच आहे. त्या सरकारचे पहिले काम या महाघोटाळ्याची चौकशी करणे हेच असेल, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर टीका केली.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शर्मा यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पतंगराव
कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस,
आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार तसेच अभय छाजेड, माजी खासदार अशोक मोहोळ, कमल व्यवहारे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप आदी या वेळी उपस्थित होते.
शर्मा म्हणाले, या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडवला आहे. नोटाबंदीमुळे बँकेत जमा झालेला सर्व पैसा काळा पैसा होता का? किती काळा पैसा जमा झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते अजूनही देत नाहीत. त्यांच्या या एका निर्णयामुळे देशातील अनेक उद्योग मोडकळीस आले. ३ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या नोकºया गेल्या. अनेकांना त्याचा फटका बसला. सामान्यांचे हाल झाले ते वेगळेच! आमचे सरकार आले की या सर्व प्रकाराची आम्ही चौकशी करूच करू.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. सत्तेवर आल्यापासून या सरकारने शेतकºयांना त्रास देण्याचे काम केले आहे. त्यांच्या धोरणांमुळे शेतकºयांना रस्त्यावर उतरणे भाग पडते आहे. मागील वेळी त्यांना लाठीमार केला, आता तर गोळीबार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशा वेळी इंदिराजी गांधी यांच्यासारख्या नेत्या हव्या होत्या. प्रदेश काँग्रेस त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रव्यापी यात्रा काढणार आहे. त्यात या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाबाबत जनजागृती करण्यात येईल. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील यांचीही या वेळी भाषणे झाली.
सुरेश कलमाडी यांची भेट
या कार्यक्रमाला येण्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची भेट घेतली. गेल्या काही वर्षांपासून कलमाडी काँग्रेसपासून बरेच दूर आहेत. ते आजारी असल्याची माहिती मिळाल्यामुळे चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली असल्याची
माहिती मिळाली.
जिल्हा व शहर काँग्रेस यांच्यातील वादाचे प्रत्यंतर या कार्यक्रमात आले. शहरातील पदाधिकाºयांना तसेच ज्येष्ठ नेत्यांना या कार्यक्रमाच्या
प्रसिद्धीत स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे बरेचसे पदाधिकारी प्रमुख नेत्यांची भाषणे झाल्यानंतर सभागृहातून निघून गेले. त्याची चर्चा
सभागृहातच सुरू होती.