Congress Candidates List: कसबा, कॅन्टोन्मेट व शिवाजीनगरला काँग्रेसचे उमेदवार; यादी २० ऑक्टोबरला जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:00 PM2024-10-18T13:00:49+5:302024-10-18T13:03:01+5:30
महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला साधारण ११० जागा मिळाल्या असून त्यातील किमान ९० टक्के जागांवरील नावे जाहीर होतील
पुणे : काँग्रेसची राज्यातील विधानसभा उमेदवारांची यादी २० ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. राज्य निवड मंडळाने तयार केलेली यादी आता दिल्लीतील छाननी समितीकडे गेली असून, तिथून ती केंद्रीय निवड मंडळाकडे अंतिम मंजुरीसाठी जाईल. त्यानंतर २० ऑक्टोबरला नावांची यादी जाहीर केली जाणार आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्याने ही माहिती दिली.
महाविकास आघाडीतकाँग्रेसच्या वाट्याला साधारण ११० जागा मिळाल्या आहेत. त्यातील किमान ९० टक्के जागांवरील नावे जाहीर होतील. त्यामध्ये पुणे शहरातील कसबा, कॅन्टोन्मेट व शिवाजीनगर या पक्षाच्या तीनही विधानसभा मतदारसंघातील नावे आहेत, असे या नेत्याने सांगितले. पक्षाकडे आलेल्या काही जागांबाबत थोडे मतभेद आहेत, काही जागा मान्य आहेत तर काही जागांची अदलाबदल करून हवी आहे. यासंदर्भात चर्चा सुरू आहे, त्यामुळे ते विधानसभा मतदारसंघ बाजूला ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, या मतदारसंघांची नावे त्यांनी सांगितली नाही.
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे असलेला पर्वती मतदारसंघ काँग्रेसने मागितला आहे. पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच पुण्यातील एका कार्यक्रमात तसे सूचित केले होते. त्यामुळे त्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मात्र याला तीव्र विरोध दर्शविला आहे.