पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार होणार संध्याकाळपर्यंत जाहीर..?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 05:21 PM2019-03-30T17:21:35+5:302019-03-30T17:23:44+5:30
मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैैठकीनंतर पुण्याच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
पुणे : काँग्रेसकडून पुण्यातील लोकसभा उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैैठकीनंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आणखी दोन-तीन तासाने उमेदवाराचे नाव स्पष्ट होईल, असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे. प्रवीण गायकवाड यांच्या पक्षप्रवेशाने उमेदवारीचा तिढा वाढला असल्याची चर्चा आहे.
भाजपाने उमेदवाराच्या नावाची घोषणा करून आठवडा उलटला तरी काँग्रेसला अद्याप उमेदवार ठरविता आलेला नाही. शनिवारी मुंबईत खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सोनल पटेल, यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची सकाळी बैठक झाली. या बैठकीमध्ये पुण्यातील उमेदवारीबाबतही चर्चा झाली. तत्पुर्वी प्रवीण गायकवाड शेकडो कार्यकर्त्यांसह सकाळीत मुंबईत दाखल झाले होते. त्यांचा पक्षप्रवेश आणि उमेदवारीचा घोषणा एकाचवेळी होईल, अशी चर्चा होती. त्यामुळे बैठकीनंतर गायकवाड यांच्या पक्ष प्रवेशाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. गायकवाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खर्गे व चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी चव्हाण यांनी रावेर येथील उमेदवाराची घोषणा केली. पण पुण्याच्या उमेदवारीबाबत चव्हाण यांनी काहीही सांगितले नाही.