पुणे: परराष्ट्रमंत्री सारख्या महत्वाच्या पदावर असताना पुण्यात येऊन विद्यार्थ्यांसमोर चुकीचा इतिहास कथन करणाऱ्या एस. जयशंकर यांचा पुणे शहर काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. पंडित नेहरू व तत्कालीन काँग्रेस नेत्यांवर वारंवार असत्य आरोप करत असलेल्या जयशंकर यांनीच आधी वास्तव काय होते त्याची माहिती घ्यावी व त्यानंतरच युवकांसमोर जावे असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
माजी आमदार उल्हास पवार यांनी काँग्रेसभवनमध्ये या विषयावर शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यावेळी उपस्थित होते. जयशंकर यांनी शुक्रवारी दुपारी पुण्यात युवकांबरोबर जाहीर संवाद साधला. त्यात त्यांनी पंडित नेहरू यांचे परराष्ट्र धोरण व काही विषयांबाबतची त्याची कृती वास्तवाला धरून नव्हती असे वक्तव्य केले. त्याचा निषेध करत असल्याचे पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, पंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर टीका करणारे आज त्यांची सत्ता आल्यावरही तेच धोरण राबवत आहेत. जगाची विभागणी रशिया, अमेरिका अशी झाली असताना नेहरू यांनी अलिप्त राष्ट्र चळवळ उभी केली. जगातील अनेक देशांना त्यात सहभागी करून घेतले. तेच धोरण आजही पुढे नेले जात आहे. असे असताना जयशंकर तरूणांना चुकीची माहिती देतात. वास्तविक जयशंकर हे स्वत: मंत्री होण्याआधी परराष्ट्रसेवेतच अधिकारीपदावर होते. त्यांना सगळे माहिती आहे, मात्र ते मंत्रीपदावरून स्वपक्षाचा अजेंडा राबवत आहेत.
मागील १० वर्षात आलेले अपयश लपवण्यासाठीच नेहरू व काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. युनोचे मिळत असलेले सदस्य नाकारले वगैरे अफवा भाजपची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पसरवत असतो असा आरोपही पवार यांनी यावेळी केला. याबाबतीत संघ वस्ताद आहे असे ते म्हणाले. या सर्व गोष्टींना काँग्रेसही तरूणांना मोठ्या मैदानात बोलावून पुराव्यानिशी उत्तर देईल असे यावेळी पवार, छाजेड, जोशी यांनी सांगितले.