पुणे : प्रदेशाध्यक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ‘एकला चलो’ची भूमिका जाहीर करण्यात आली असली तरी शहर व जिल्हा काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांपासून ते साध्या कार्यकर्त्यांपर्यंत त्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामागे पक्षाच्या जिल्ह्यातील राजकीय शक्तीचे कारण आहे. महापालिका ते ग्रामपंचायत अशा सर्वच संस्थांमध्ये अगदीच मोजका अपवाद वगळता पक्षाची राजकीय अवस्था नाजूक आहे. एकत्र लढलो तर फरपट होईल व स्वतंत्र लढलो तर तेवढी शक्तीच नाही अशा दुविधेत जिल्ह्यातील बहुसंख्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.
अशी आहे शहरातील स्थिती
एकूण विधानसभा मतदारसंघ- ८
काँग्रेस- ०
महापालिका- एकूण नगरसेवक- १६४
काँग्रेसचे नगरसेवक- पक्षचिन्हावर आलेले- ९
सहयोगी-१
स्वीकृत-१
एकूण ११
अशी आहे जिल्ह्यातील स्थिती
लोकसभेच्या एकूण जागा- ४
काँग्रेस- ०
जिल्ह्यातील एकूण विधानसभा मतदारसंघ-१०
काँग्रेसचे आमदार- २
जिल्हा परिषदेच्या एकूण जागा- ७५
काँग्रेसच्या जागा- ७
पंचायत समिती एकूण जागा- १५०
काँग्रेसच्या जागा- १६
आमच्या निरीक्षक सोनल पटेल लवकरच पुण्यात येत आहेत. विधानसभा मतदारसंघ प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून आम्ही त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविणार आहोत.
रमेश बागवे- शहराध्यक्ष, काँग्रेस
आमचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही स्वतंत्र लढणार की आघाडी, याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविला आहे. त्यात काय म्हटले आहे याबाबत जाहीर बोलणार नाही. आमची दोन्ही गोष्टींसाठी तयारी आहे इतकेच सांगता येईल.
आमदार संजय जगताप
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस