पुणे: काँग्रेस भवनमधील कोरोना रुग्ण सहायता कक्ष २४ तास सुरू राहणार आहे. प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी या कक्षाचे उद्घाटन झाले.
छाजेड म्हणाले की, देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. पुण्यासह राज्यातील अनेक शहरांची आरोग्य स्थिती खराब होत आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात कोविड साहाय्य व मदत केंद्र सुरू करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पुण्यात हा कक्ष कार्यरत झाला आहे.
राज्यातील हे सर्व कक्ष प्रदेश काँग्रेस कमिटीतील कक्षाबरोबर जोडले आहेत. त्यातून २४ तास गरजू रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना आवश्यक ती मदत केली जाईल. पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ते उपचार उपलब्ध करून देतील. अडचणी आल्यास राज्य मदत व साह्य केंद्राशी थेट संपर्क करून रुग्णांच्या अडचणी सोडवतील.
कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी, अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर, अमिर शेख, राजेंद्र शिरसाट, रमेश अय्यर, सचिन आडेकर, सोनाली मारणे, विशाल मलके, भूषण रानभरे, अनिस खान, सुनील पंडित व अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.