पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांना शुक्रवारी एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
या प्रकरणी गुरुवारी सत्र न्यायाधिश ए. वाय. थत्त्ते यांनी अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे तिघे शुक्रवारी सकाळी 10 वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजार झाले. पाषाण आणि कात्रज येथील तलावांमध्ये जलपर्णी नसतानाही 23 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याची टीका करून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात आंदोलन केले होते. त्यावेळी आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. त्या दरम्यान धंगेकर यांनी निंबाळकरांना उद्देशून चोर आणि भ्रष्टाचारी म्हटले. त्यावर निंबाळकर यांनीही धंगेकर यांच्याकडे बोट करून मला चोर, भ्रष्टाचारी म्हणण्याची त्यांची लायकी आहे का? असे विधान केले. त्यानंतर झालेल्या वादात निंबाळकर यांना धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणात शिंदे, धंगेकर यांच्यासह अन्य 15 ते 16 जणांवर गुन्हा दाखल आहे.
यात रवींद्र हेमराज धंगेकर (वय 51, रा. लोणार आळी, रविवार पेठ), मंदार हेमंत पुरोहित ( वय 34) आणि अमित मोहन देवरकर ( वय 38, दोघेही रा. कसबा पेठ) अशा तिघांची अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी पी. डी. सवांत यांनी पोलीस कोठडीत रवानगी केली. याबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पूर्वी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या गुन्ह्यात धंगेकर यांचा पुढाकार असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने धंगेकर यांचा जामीन फेटाळला.