काँग्रेसची देशात आजची मतांची टक्केवारी इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा जास्त - पृथ्वीराज चव्हाण
By राजू इनामदार | Published: March 31, 2023 06:09 PM2023-03-31T18:09:45+5:302023-03-31T18:26:30+5:30
देशात विरोधक एकत्र आल्यास भाजपचा पराभव होईल
पुणे: देशातील राजकीय स्थिती असाधारण आहे ही वस्तूस्थिती मान्य करायला हवी. राहूल गांधीविरोधात ज्याप्रकारे कारवाई झाली तो प्रकार राजकीय षडयंत्राचाच आहे. देशातील या विषयावर विरोधकांचे ऐक्य करणे काँग्रेसलाच शक्य आहे, मात्र ते लक्षात घेऊनच त्यांनी थोडा समजूदारपणा दाखवायची गरज आहे असे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
राहूल गांधी यांच्या समर्थनासाठी जाहीर केलेल्या संकल्प यात्रेची माहिती देण्यासाठी चव्हाण काँग्रेसभवनमध्ये आले होते. पत्रकार परिषद झाल्यानंतर लोकमत बरोबर विशेष संवाद साधताना त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. काँग्रेसची देशात आजची मतांची टक्केवारी इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा जास्त आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये ऐक्य करण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घ्यायला हवा. मात्र त्यासाठी काँग्रेसने थोडा समजतूदारपणाही दाखवायला हवा असे चव्हाण म्हणाले.
म्हणजे काय? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, “असे ऐक्य सुरू झाले की लगेचच नेतृत्व कोणी करायचे असा मुद्दा पुढे येतो व त्यावरून सगळे फिसकटते. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही तेच हवे आहे. विरोधक एकत्र झाले त्यांचा पराभव होतो. याचे अगदी नेमके उदाहरण पुणे जिल्ह्यातील कसबा व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात नुकतेच दिसले. कसब्यात एकाचएक उमदेवार होता तर काँग्रेसचा विजय झाला, चिंचवडमध्ये तसे झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. तिथे विरोधकांमधील दोन्ही पराभूत उमेदवारांची मतांची बेरिज विजयी उमेदवाराच्या मतांच्या पुढे आहे.”
समजूतदारपणा म्हणजे काय यावर चव्हाण यांनी विरोधकांच्या ऐक्य प्रक्रियेत नेतृत्वाचा मुद्दाच उपस्थित करू नये असे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “काँग्रेसने याबाबतीत दोन पावले मागे यायला हवे, तसेच अन्य विरोधकांनाही या गोष्टीचा आग्रह धरू नये. आधी भाजपचा पराभव, ते ज्या पद्धतीने सरकार चालवत आहेत, त्याचा पराभव हे मुख्य उद्दीष्ट आहे. जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसच्या विरोधात असे ऐक्य यशस्वी करून दाखवले. त्यावेळेसही विरोधकांमध्ये कोणा एकाचे नेतृत्व नव्हते. सामुहिकपणे सगळे नेते नेतृत्व करत होते. त्यामुळे आता त्याचीच पुनरावृत्ती आवश्यक आहे.”
काँग्रेसमध्येच जीवंतपणा दिसत नाही या थेट प्रश्नावर चव्हाण म्हणाले, ''असे बाहेरून पाहणाऱ्यांना वाटते. देशातील असाधारण राजकीय परिस्थितीची पहिली जाणीव काँग्रेसलाच झाली. त्याविरोधात पहिला आवाजही काँग्रेसनेच उठवला आहे. आजही देशात काँग्रेस हाच तळागाळातील राष्ट्रीय पक्ष आहे. मात्र याचाच अर्थ त्यांनीच सतत आघाडीवर असावे असा होत नाही. उलट त्यांनी समंजसपणा दाखवावा अशी इतरांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. ते ओळखून काँग्रेसने पावले टाकावीत. आम्ही तसेच सुचवत असतो. आता देश, राज्य, जिल्हा तसेच गावस्तरावर संकल्प यात्रांचे आयोजन जाहीर केले आहे. यातही विरोधकांना सहभागी करून घ्यायचा विचार सुरू आहे. यात्रानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक होणार आहे.''