पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून स्वबळाचा आग्रह होत असला तरी काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मात्र महाविकास आघाडी की स्वबळावर याबाबत संभ्रमात आहेत. स्वबळावर लढायचे तर तेवढी राजकीय ताकद नाही व महाविकास आघाडीत जायचे तर बहुतेकांना सर्वाधिक अविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल असल्याचे दिसते आहे.
एकेकाळी पुणे शहरात व महापालिकेतही वर्चस्व असलेल्या काँग्रेसची आजची राजकीय अवस्था तशी नाही. १६४ नगरसेवकांच्या सभागृहात काँग्रेसचे फक्त १० नगरसेवक आहेत. आता तर नव्या प्रभागरचनेत सर्व मिळून १७३ नगरसेवक असणार आहेत. २३ गावे महापालिकेला जोडली गेली आहेत. स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद आहेत. हक्काचा मतदारही दुरावला गेलेला मागील काही निवडणुकांमधील मतदानावरून दिसून येते. सर्व प्रभागांमध्ये उमेदवार देता आले नाहीतर तर तिथेच पक्षाची अर्धी हार होईल असे काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा पक्षाच्या स्थानिक नेत्यांना अतिआत्मविश्वासाचा वाटतो.
महाविकास आघाडी करून निवडणूक लढवली तर तिघांची ताकद एकत्र होईल. त्याचा फायदा काँग्रेसला होईलही, भारतीय जनता पार्टीला पायबंद घालता येईल हे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मान्य आहे, मात्र अशी आघाडी करताना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बहुसंख्य काँग्रेसजनांना अविश्वास आहे. सध्याचे १० उमेदवार व महापालिकेच्या गत पंचवार्षिक निवडणूकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे उमेदवार अशा मिळून साधारण ३० जागा काँग्रेसला आघाडीच्या जागा वाटपात मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असेल.
राष्ट्रीय पक्ष असताना इतक्या कमी जागा घेऊन लढायचे का? प्रभागांमधील इच्छुक कार्यकर्त्यांचे बंड झाले तर ते थोपवायचे कसे असे प्रश्न यातून काँग्रेसमध्ये विचारले जात आहेत. सध्याच्या महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. शिवसेनेचे ९ नगरसेवक आहे. सर्वाधिक नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच आघाडीत वर्चस्व राहील. ते मान्य करायचे तर मग काँग्रेसच्या शहरातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल असे काही स्थानिक नेत्यांना वाटते.
''प्रदेशाध्यक्षांचा आदेश असेल त्याप्रमाणे यासंबधीचा निर्णय होईल. आम्ही शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, जुने नवे नेते यांच्याबरोबर चर्चा करून त्याचा एकत्रित अहवाल प्रदेशकडे पाठवला आहे. त्याचा विचार करूनच काय तो निर्णय घेतला जाईल असे रमेश बागवे (शहराध्यक्ष, काँग्रेस) यांनी सांगितले.''