'ज्या राज ठाकरेंना आम्ही पाहिलं ते...'; मनसे-शिंदे सेनेच्या जवळीकीवर बाळासाहेब थोरात रोखठोक बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 01:39 PM2022-09-07T13:39:18+5:302022-09-07T13:40:25+5:30
राज ठाकरेंमध्ये पूर्वीसारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
पुणे-
राज्याच्या राजकारणात आता आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदे सेनेची नवी समीकरणं पाहायला मिळू शकतात असं विचारण्यात आलं असता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंमध्ये पूर्वीसारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही. आम्ही ज्या राज ठाकरेंना पाहिलं होतं ते आता पूर्वीसारखे राज ठाकरे राहिलेले नाहीत, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. ते पुण्यात एका सार्वजनिक गणपती दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राज ठाकरे यांचे १८ सप्टेंबरपासून ‘मिशन विदर्भ’; नागपूर, चंद्रपूर व अमरावती महापालिकेवर फोकस
"मनसे आणि शिंदे सेना एकत्र येतीलही शेवटी आता असं आहे की राज ठाकरे पूर्वी जे होते तसे राहिलेले नाहीत. खरे राज ठाकरे आम्ही त्यावेळी पाहिले होते. पण आता राज ठाकरेंमध्ये लढाऊबाणा राहिलेला नाही", असं बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यांनी यावेळी भाजपावरही जोरदार निशाणा साधला. भाजपाला काहीही करा पण सत्ता हवी हेच त्यांचं धोरण झालं असल्याचं थोरात म्हणाले.
भाजपाला फक्त सत्ता हवी
"काही करा पण सत्ता हवी हेच भाजपाचं धोरण झालं आहे. लोकशाहीला हे अभिप्रेत नाही. सत्ते करता काहीही हेच अमित शहांच्या भाषणातही दिसून आलं. पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न यापुढील काळातही सुरूच राहणार आहे. महाविकास आघाडी आजही एकत्र आहे. भाजपाची कार्यप्रणाली लोकशाहीला अनुकूल नाही. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील. आगामी काळात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळे असा विश्वास आहे", असं बाळासाहेब थोरात म्हणाले.