पुणे: केंद्र सरकारने मंत्री बदलले,पण डबे बदलून उपयोग नाही इंजिनच खराब झाले आहे अशी बोचरी टीका केंद्रातील मंत्रिमंडळ बदलावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र आमच्या महाविकास आघाडी सरकारची गाडी पण चांगली आणि ड्रायव्हरपण चांगला आहे असेही ते म्हणाले.
पुण्यात काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना पटोले म्हणाले, भाजपाची संस्कृतीच खोटे बोलण्याची आहे. मोदी सत्तेवर आले ते खोटे बोलूनच सत्तेवर आले आहे. परवा विधानसभेत विरोधी पक्षनेते खोटे बोलले. एकीकडे शिव्यांसाठी माफी मागतात. दुसरीकडे शिव्या दिल्याच नाही म्हणतात. त्यांचे सगळे हेच सुरू आहे असे पटोले म्हणाले.
काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा मुद्दा नाहीच, अंतर्गत लोकशाही आहे. आता सर्वांना राहुल गांधी बरोबर वाटतात. नोटाबंदी, जीएसटी, कोरोना यावर त्यांनी मांडलेले मुद्दे बरोबर असल्याचे देशाला पटू लागले आहे. देशात बदल होणार याचेच हे चिन्ह असल्याचा दावा पटोले यांनी केला.
केंद्र सरकारने सहकार मंत्रालय काढले आहे. त्यांचा हेतू आत्ता काही सांगता येणार नाही. पण राज्यातील साखर कारखान्यांच्या चौकशीत चंद्रकांत पाटलांनी नितीन गडकरींच्या कारखान्यांची नावे टाकली हे मात्र काही वेगळे आहे.
ईडी, सीबीआयसारख्या देशातील महत्वाच्या संस्थांना मोदी यांनी चिल्लर करून टाकले आहे. ते काय करतील सांगता येत नाही. त्यामुळेच भाजपा सोडला. तिथे स्वायत्ता नाही. राज्यातही तिथे गेलेले अनेकजण लवकरच परतताना दिसतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
यावेळी सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश.बागवे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी तसेच आजीमाजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.