काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

By नितीन चौधरी | Published: May 30, 2024 06:20 PM2024-05-30T18:20:22+5:302024-05-30T18:22:36+5:30

राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे....

Congress leader Rahul Gandhi ordered to appear before Pune court, what is the actual case? | काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुढील तारखेला पुणेन्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी गुरुवारी दिले आहेत. राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत आढळलेले तथ्य आणि  विश्रामबाग पोलिसांचा तपासणी अहवाल  प्रथमदर्शनी  ग्राह्य धरीत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी नुकताच तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला. त्यामध्ये राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाणार आहे. त्यानुसार पुढील तारखेला पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले होते. या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती.

अखेर पोलिसांनी आपला तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. आता पोलिसांच्या अहवालाच्या आधारे न्यायालयाकडून  ‘सीआरपीसी’च्या कलम २०४ नुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, त्याप्रमाणे राहुल गांधी यांना पुढील तारखेला पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत असे  सात्यकी सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले.  

Web Title: Congress leader Rahul Gandhi ordered to appear before Pune court, what is the actual case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.