पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार
By राजू हिंगे | Published: April 26, 2024 08:31 AM2024-04-26T08:31:46+5:302024-04-26T08:33:03+5:30
आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असून प्रचाराचा धुराळा उधळणार आहे....
पुणे :पुणे , शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात ३ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. एसएसपीएमएसच्या मैदानावर सांयकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून काँग्रेस शक्तिप्रदर्शन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी रेसकोर्सवर जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची सभा होणार आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असून प्रचाराचा धुराळा उधळणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे, पुण्यात रविंद्र धंगेकर, शिरूरमध्ये अमोल कोल्हे, मावळमध्ये संजीव वाघिरे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या चारही लोकसभा मतदारसंघासाठी राहुल गांधी यांची पुण्यात ३ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.