पुणे - भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा काँग्रेस प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. स्वत: खासदार काकडे यांनीच या संदर्भात माहिती दिली. पुणे लोकसभा लढवण्यासाठी जे जे इच्छुक उमेदवार आहेत, ते सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार पुणे कट्टावर एकत्र आले होते. त्यावेळी बोलताना काकडे यांनी ही माहिती दिली. लवकरच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जे जबाबदारी देतील, ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.
मी दिल्लीला जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, तसेच मी काँग्रेस पक्षात काम करण्यास इच्छुक असल्याचंही त्यांच्याशी बोललो. त्यावर, त्यांनी माझे स्वागत केलं असून लवकरच पक्षप्रवेश होईल, असे काकडे यांनी पुण्यात पत्रकारांना बोलताना सांगितले. मुख्यमंत्री आणि मी यापूर्वीही बोललो आहेत, मी कुठल्याही पक्षात गेलो तरी माझी आणि मुख्यमंत्र्यांची मैत्री कायम राहिल. पक्ष वेगळी असतात, पक्षाचे विचार वेगळे असतात, पक्षाची धोरणं वेगळी असतात. सर्व जातीधर्मांचा आदर करुन, सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन पुढे जाणारा एकमेव पक्ष काँग्रेस आहे. त्यामुळे पक्षाची विचारधारा लक्षात घेऊनच मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं काकडे यांनी सांगितलं. मी कुठल्याही अटी शर्तीविना काँग्रेसमध्ये जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. आदेश दिला तर निवडणूक लढवले, अन्यथा पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल, असेही काकडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी भाऊ मानले. मात्र याच भावाने मला लाथाडलं असल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुण्यात दिली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यावर काकडे यांनी हे विधान केल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. काकडे यांना पुण्यातून लोकसभेची जागा लढवण्यात रस आहे अशी माहिती त्यांनी यापूर्वीच दिली आहे. त्यासाठी भाजपकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे काकडे यांनी इतर पक्षांचे दरवाजे ठोठवायला सुरुवात केली. याच कारणांसाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, आज काँग्रेसमध्ये प्रवेश करून काकडेंनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.