मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 05:37 PM2024-05-10T17:37:53+5:302024-05-10T17:38:55+5:30
कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे.
Sangli Lok Sabha ( Marathi News ) : महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागावाटपात सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत मोठा कलगीतुरा रंगला होता. चर्चेअंती ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मविआकडून विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रही असणारे काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम हे या निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे. अशातच विश्वजीत कदम यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याने या संभ्रमात आणखीनच भर टाकली आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साहित्यिक विश्वास पाटील यांच्यासमोर विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे की, "कदम आणि पाटलांचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. पाटलांच्या मागे कदम नेहमीच उभे आहेत, मात्र कुठल्या पाटलांच्या मागे उभे आहोत, हे ४ जूनलाच समजेल." कदम यांनी हे कोड्यात टाकणारं वक्तव्य करताच विश्वास पाटील यांनीही संधी साधत "बाळासाहेब तुमची दृष्टी 'विशाल' आहे" असं म्हटलं.
दरम्यान, विश्वजीत कदम यांनी आज केलेल्या वक्तव्याने त्यांनी यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक असतानाही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मदत केली आहे की काय, अशा चर्चांना सांगलीच्या राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
सांगलीत मतदानाची टक्केवारी किती?
सांगली लोकसभेसाठी २०१९ मध्ये ६५.३८ टक्के मतदान झाले होते. २०२४ च्या निवडणुकीत ३.११ टक्के मतदानाची घट होऊन ६२.२७ टक्के मतदान झाले. पण, या घटलेल्या टक्केवारीचा फटका भाजपचे खासदार संजय पाटील यांना की अपक्ष विशाल पाटील यांना बसणार, याविषयी तर्कवितर्क मतदारांमध्ये सुरू आहेत. या दोघांना धक्का देऊन महाविकास आघाडीचे पैलवान चंद्रहार पाटील चमत्कार दाखविणार, अशी चर्चा रंगली आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदार याद्यांतील घोळ, ईव्हीएममधील बिघाड, तुरळक वादावादी वगळता ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभावी जनजागृतीकडे पाठ फिरवून नागरिकांनी मतदान करण्यास निरुत्साह दाखवला. सांगली लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
भाजपचे संजय पाटील आणि उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील अशी दुरंगी लढत होईल की काय, अशी चर्चा सुरवातीला रंगली होती. विशाल पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंडखोरी केली. यामुळे सांगली लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीने तिरंगी झाली. २०१९ मध्ये ६५.३८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत संजय पाटील यांनी बाजी मारली होती. पण, या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील राहिले होते. यामुळे २०२४ च्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीकडे सर्वांचेच लक्ष होते. पण, मतदार आणि प्रशासनाच्या निरुत्साहामुळे मतदानाची आकडेवारी ३.११ टक्क्यांनी घट होऊन ६२.२७ टक्के मतदान झाले.