पुणे : मतभेदांची दरी बुजवण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्षांनी पुढाकार घेऊन गुरुवारी सायंकाळी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहून काही नेत्यांनी नाराजी दर्शवली. तर, उपस्थित राहिलेल्यांनी कार्यक्रमांना बोलावत नाही, बैठकांना कशाला बोलावता? असा सवाल केला. शहरात पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बॅनर लावले जात असून, त्यावर शुक्रवारी कडी झाली व काही कार्यकर्त्यांनी एका पदाधिकाºयाच्या नावे ‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’ असे फ्लेक्सच झळकावले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्येच दुरावा असल्याचे समोर येत आहे.आजी-माजी आमदार तसेच विविध आघाड्यांच्या प्रमुखांना शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी काँग्रेस भवन येथे बैठकीला बोलावले होते. या बैठकीला अनेकांनी दांडी मारली. आमदार अनंत गाडगीळ यांनी पक्षाच्या आमदारांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही नेत्यांविरोधात प्रमुख चौकांमध्ये टीका करणारे बॅनर लावले गेले. या पार्श्वभूमीवर, बागवे यांनीच पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती. बैठकीला १० नगरसेवकांपैकीही काही जण गैरहजर होते. उपस्थितांमध्येही नाराजीचाच सूर होता. उपस्थितांपैकी काहींनी तक्रारी केल्या. बागवे यांनी समजूत घालत ‘पक्षाची स्थिती अवघड आहे, भांडत बसलो तर अवघड होईल. त्यामुळे मतभेद मिटवा, एकत्र या, पक्ष वाढवू,’ असे आवाहन केले. काही पदाधिकाºयांनी टाळले जात असल्याचे सांगितले. अखेरीस बागवे यांनीच समजूत घालून बैठकीचा समारोप केला. दरम्यान शनिवारी काही चौकांत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या विरोधात फलक लावण्यात आले. त्यात ‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’ अशी टीका करण्यात आली आहे. त्यावर राजू काळे, अनिल कोकाटे, विश्वनाथ भोसले, परशुराम कोलते, मुबारक शेख अशी नावे आहेत. ‘विश्वजित एवढेच नाव मोठे करून त्यावर तू परत सांगलीला जा,’ असे लिहिण्यात आले आहे.फलक लावणारे कार्यकर्ते काँग्रेसचे नाहीतच. खोटी नावे त्यावर देण्यात आली आहेत. पक्षातून मला पूर्ण सहकार्य आहे. मी स्वत: पक्षासाठीच काम करतो आहे. ९० टक्के कार्यकर्ते, पदाधिकाºयांचा मला पाठिंबा आहे. खोट्या नावाने अशा कारवाया करणाºयांची दखल घेण्याचे मला काही कारण नाही.- विश्वजित कदम, प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेसगुरुवारी सायंकाळी बोलावलेली बैठक व्यवस्थित झाली. वादविवाद झालेले नाहीत. काही नेते गैरहजर होते; मात्र त्यांनी तशी पूर्वकल्पना दिली होती. गणेशोत्सवामुळे काही नगरसेवकांना येणे शक्य झाले नाही. त्यांनी त्याबाबत आधीच सांगितले होते.- रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस कमिटी पुणे
काँग्रेस नेत्यांमध्ये दुरावा, बैठकीला अनेकांची दांडी, फ्लेक्समधून वादळांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 6:12 AM