लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटक या काँग्रेसप्रणित कामगार संघटनेने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याविरोधात मुंबईत तीन दिवस आंदोलन केले. त्यांनतर प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले, मात्र मंत्री या बैठकीला गैरहजर होते.
डॉ. राऊत काँग्रेसचेच असून ते कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना कंपनीच्या सेवेत घ्यावे, प्रकल्पग्रस्तांना कंपनीत सामावून घ्यावे, पदोन्नती व अन्य काही मागण्या इंटकच्यावतीने वारंवार करण्यात येत होत्या. मात्र, मंत्री तसेच प्रशासकीय स्तरावर त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे इंटकच्यावतीने मुंबईत कंपनीच्या मुख्यालयासमोर तीन दिवसांचे धरणे आंदोलन केल्याचे संघटनेने सांगितले.
त्यानंतर मुंबईत बुधवारी सायंकाळी प्रशासनाने मंत्रालयात इंटकला बैठकीस बोलावले. इंटक फेडरेशनच्यावतीने अध्यक्ष आमदार भाई जगताप, महासचिव प्रकाश गायकवाड, सुनील शिंदे, प्रशासनाच्या वतीने प्रधान ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे, प्रभारी कार्यकारी संचालक सुगत गमरे या वेळी उपस्थित होते.