पर्वती विधानसभा मतदारसंघातून रणपिसे १९८५ व १९९० मध्ये निवडून आले होते. तत्पूर्वी १९८० मध्ये ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. कॉंग्रेसने विधानपरिषदेवर त्यांना तीनदा संधी दिली. अत्यंत ऋजू स्वभावाचे म्हणून ते परिचीत होते. त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे समजताच कॉंग्रेसच्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी त्यांची खासगी रुग्णालयात भेट घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांत गर्दी केली होती.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याबरोबर रणपिसे यांचा स्नेह होता. पुण्यातच स्थायिक असलेल्या पाटील यांंनी बुधवारी दुपारी रुग्णालयात रणपिसे यांची भेट घेतली. ‘शरद माझा धाकटा भाऊ आहे त्याला लवकर बरे करा,’ असे त्या डॉक्टरांंना म्हणाल्या होत्या अशी माहिती नगरसेवक अविनाश बागवे यांनी दिली. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर व रणपिसे यांची महाविद्यालयीन जीवनापासून घनिष्ट मैत्री होती. दोघेही काँग्रेसचे काम करत. त्यांना पदेही मिळाली. रणपिसे यांच्या पार्थिवावर कोरेगाव पार्क स्मशानभूमी येथे शुक्रवारी (दि. २४) सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
“रणपिसे यांच्या निधनाने दुर्बल, वंचित समाजबांधवांच्या विकासाला वाहून घेतलेले अभ्यासू, मृदूभाषी, संवदेनशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. विधान परिषदेत पक्षाचे गटनेते म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ सहकारी नेतृत्वाचे निधन हा महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे,” अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वाहिली.