पुणे: महापालिकेने शहरातील शाळांच्या इमारतीचा मिळकत कर थकला म्हणून शैक्षणिक संस्थाना नोटिसा पाठवून शाळांवर कारवाई केली. त्याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या वतीने महात्मा फुले यांच्या वाड्यासमोर रस्त्यावर शाळा भरवून महापालिकेचा निषेध केला. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, माजी आमदार उल्हास पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन महापालिका प्रशासनाने भान ठेवून काम करावे असे सांगितले व या धोरणाचा निषेध करत असल्याचे जाहीर केले.
शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी सांगितले की बड्या धेंडाना महापालिका त्यांचा कितीही कर थकला असला तरी हप्ते बांधून देत असते. शैक्षणिक संस्थांवर मात्र थेट नोटिसा बजावल्या जातात, शाळांना टाळे ठोकले जाते. ज्या भूमीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली त्याच भूमीत अशा प्रकारची कारवाई व्हावी याचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे.
डॉ. आढाव व माजी आमदार पवार यांनीही या निर्णयावरून महापालिकेवर टीका केला. आढाव यांनी यासंदर्भात महापालिकेने काहीतरी धोरण ठरवायला हवे असे मत व्यक्त केले. नरेंद्र व्यवहारे, वाल्मिक जगताप,ऋषीकेश बालगुडे व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.