पुणे : राहूल गांधी यांना देशात काहीच चांगले दिसत नाही व मतदार सांभाळण्यासाठी ते विदेशात जावून देशावर टीका करत आहेत. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे राहुल गांधी अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी पुण्यात केली. शहरात एका कार्यक्रमानिमित्त भाजप कार्यालयात अगुराग ठाकूर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, धीरज घाटे, गणेश घोष, अर्चना पाटील, सुशील मेंगडे, राघवेंद्र मानकर, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
ठाकुर म्हणाले की, काँग्रेस नेतृत्वामध्ये बदल झाला, तरी अधिकार मात्र कुटुंबाकडेच आहेत. पक्ष कार्यालयातही एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचे छायाचित्र लावण्यात आले आहे. काँग्रेस म्हणजे एक परिवार आहे. राहूल गांधी यांचे पक्षामध्ये कोणी ऐकत नाही म्हणून ते परदेशात जाऊन केंद्र सरकार व भारताची बदनामी करत आहेत. सैनिकांबद्दल राजस्तानमध्ये त्यांनी काढलेले उद्गार, पुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी लष्कराविषयी केलेले भाष्य यातून लष्कराचे खच्चीकरण करण्याचेच त्यांचे प्रयत्न दिसतात.
सिसाेदियांच्या अटक पण खरा सुत्रधार केजरीवाल
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया यांना अटक झाली असली तरी त्यामागचा खरा सूत्रधार अरविंद केजरीवाल आहे. दारुवरचे कमिशन चार टक्क्यांवरून १२ टक्के करण्यासाठी जनादेश मिळाला होता का? दिल्लीतील चौकशीत पुन्हा पुन्हा ‘व्ही’ हे नाव समोर येत आहे. व्ही हे कोणाचे नाव आहे. या नावाचे दिल्ली सरकारमध्ये महत्त्व का वाढले आहेही असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला.
तपास यंत्रणेवर बिनबुडाचे आराेप
तेलंगणा निर्माण झाले तेव्हा या राज्याची परिस्थिती काय होती. आज परिस्थिती काय आहे. बिहारमध्ये भ्रष्टाचाराने उच्चांक गाठल्यानंतर तपास यंत्रेणेने तपास कार्याला सुरूवात केली आहे. या यंत्रणेला सहकार्य करण्याऐवजी यंत्रणेचा बिहार आणि तेलंगणात वाईट प्रचार केला जात आहे. भ्रष्टाचार केला नसेल, तर भिती कसली. तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यांनी यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे. असेही ते म्हणाले.