पुणे : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना जहांगीर रुग्णालयामध्ये २३ एप्रिल रोजी दाखल केले होते. ९ मे रोजी ते कोरोनामधून मुक्त झाले. त्यांची प्रकृती सुधारत असतानाच त्यांना ‘सायटोमेगॅलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाली होती. औषधांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे चांगली सुधारणा होत होती. ते आता धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते, असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर, शनिवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी खालावली. उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी त्यांनी अखरेचा श्वास घेतला.
सातव यांचे निधन झाल्याचे समजताच आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री विश्वजित कदम, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, तसेच माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे यांनी जहांगीर रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यांच्या मातोश्री रजनी सातव या शनिवारी रात्रीच पुण्यात आल्या होत्या. नातवाईकांशी चर्चा केल्यानंतर, राजीव सातव यांच्या पार्थिवावर मूळगावी सोमवारी १७ मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव हिंगोलीकडे रवाना करण्यात आले.
कोरोनाची लागण झाल्यानंतर, राजीव सातव यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये २३ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्याना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलविण्याचा विचार करण्यात येत होता. परंतु, त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना प्रवास झेपणार नाही, असे डॉक्टरांचे मत पडल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातच उपचार करण्यात आले. याही स्थितीमध्ये त्यांनी संघर्ष सुरु ठेवला होता. त्यातून हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत गेली. ९ मे रोजी त्यांची टेस्ट करण्यात आली. तेव्हा त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. ते कोरोनातून मुक्त झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वाटत असतानाच त्यांना ‘सायटोमेगॅलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले.